मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. रेल्वे बजेट 09
Written By अभिनय कुलकर्णी|

कोलकत्यावर 'ममत्व' मुंबईला का 'सापत्न'?

मुंबईला पूर्ण देशभराशी जोडून अधिकाधिक लोंढे येथे आदळवण्याची करामत लालूंप्रमाणे ममता बॅनर्जींनीही आपल्या बजेटमध्ये केली, मात्र रोज धक्काबुक्कीच्या प्रवाशाचे अग्निदिव्य करणार्‍या चाकरमान्यांचा साधा विचारही केला नाही. कोलकत्यावर मेहेरनजर दाखविणार्‍या ममतांच्या भाषणात मुंबईच्या लोकल ट्रेन्सचा उल्लेखही आला नाही. त्यासाठी तरतूद तर दूरची बाब.

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला 'वर्ल्ड क्लास' स्टेशन बनविणे आणि अनेक 'नॉन स्टॉप' गाड्यांच्या माध्यमातून मुंबईला देशाशी जोडणे या व्यतिरिक्त मुंबईचा पूर्ण बजेटभर उल्लेख झाला नाही. रोज साठ लाख लोक प्रवास करत असलेल्या मुंबईच्या लोकल्ससाठी काही विशेष घोषणा होईल, अशी अपेक्षा होती, पण तीही फोल ठरली.

विशेष म्हणजे यावेळी लोकसभा निवडणुकीत मुंबईतून युपीएला घसघशीत सहा खासदार मुंबईने दिले असूनही मुंबईकरांच्या पारड्यात मात्र काहीही पडलेले नाही. या उलट ममतांनी कोलकत्याही विशेष 'ममता' दाखविताना तिथल्या मेट्रो रेल्वेची कक्ष वाढवली. गाड्यांची संख्या वाढवली. तिथल्या मदरशांसह सर्व विद्यार्थ्यांसह तिकिटांत सवलत दिली. आपल्याकडे केवळ कोलकता मेट्रो असल्याने (दिल्ली मेट्रो रेल्वे मंत्रालयाच्या थेट अखत्यारीत नाही.) आपण या सवलती जाहीर करत आहोत, असे सांगणार्‍यांना त्यांच्याच रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येत असणार्‍या मुंबई लोकल सेवेसाठी मात्र छदामही दिला नाही. त्याचवेळी मुंबईला बाहेरून येणार्‍या गाड्यांची संख्या वाढवून इथे परप्रांतीयांसाठी मुंबई आणखी मोकळी केली.

दरम्यान, ममतांनी मुंबईच्या तोंडाला पाने पुसल्याबद्दल खासदारही नाराज आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबईतील खासदार संजय दीना पाटील यांनी ही नाराजी बोलून दाखवली. आपण या बजेटवर समाधानी नाही, असे सांगतानाच मुंबईतील इतर खासदारांच्याही याच भावना असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात ममता बॅनर्जींची भेट घेऊन त्यांना पुन्हा निवेदन देण्यात येईल, असे ते म्हणाले. खासदार संजय निरूपम यांनी मात्र, ममतांन जाहिर केलेल्या योजना सर्व मुंबईवासीयांसाठीच आहेत, असे सांगून मुंबईसाठी काहीही नाही, असे म्हणण्यात अर्थ नसल्याचे सांगितले.