राज्यात पावसाला सुरुवात
मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद, बीड, पंढरपूर आणि जळगावमध्ये पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.
कालच्या पावसानं मुंबईत काही ठिकाणी पाणी साचलं. काल संध्याकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. कल्याण, ठाणे, नवी मुंबई, रायगड परिसरातही पावसाची संततधार सुरू होती. रविवार असल्यानं मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाळी वातावरणामुळे हिरवाई पसरली असून, दाट धुक्याच्या चादरीनं वातावरण थंडगार झाले आहे.
पाणीसाठ्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. जळगावच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. लातूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार आगमन केले होते. जिल्ह्यात जवळपास ४५ मिमी पावसाची नोंद झाली होती. पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात पाऊस बरसला. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता काहीशी दूर झाली.