1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 2 एप्रिल 2015 (12:15 IST)

रेल्वे स्थानकावरच पाच तास रंगले ‘संमेलन’

साहित्य संमेलनासाठी घुमानला निघालेली गुरुनानक देवजी एक्स्प्रेस तब्बल पाच तास उशीरा धावल्याने मुंबईसह पुणे आणि पुढील स्टेशनवर ‘संमेलन’ रंगले. सारस्वतांना ‘गुड बाय’ म्हणण्यासाठी आलेल्या मान्यवरांनीही ताटकळत अखेर काढता पाय घेतला. त्यामुळे मोठ्या उत्साहात जमलेले सारस्वत नाराज झाले.

छत्रपती शिवाजी टर्मिनसवर साहित्यिकांसह सर्वच साहित्यप्रेमींना ताटकळत राहावे लागले.  पुण्यात पहाटे पाच वाजता ही गाडी येणे अपेक्षित असल्याने पहाटे तीन पासूनच सारस्वतांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. रांगोळ्या, सनई-चौघडे आणि फुगड्यांचा फेरा धरत उत्साहाला उधाण आले. पहाटेची वेळ सरुन सात वाजले तरी गाडी येईन म्हटल्यावर चर्चा सुरु झाली. अखेर ही गाडी लेट असल्याची बातमी आली. पुण्यात या एक्स्प्रेसला शुभेच्छा द्यायला आलेले महापौर दत्तात्रय धनकवडे यांनीही मध्यावरच स्थानकाहून परत फिरणे पसंत केले.  पालकमंत्री गिरीश बापट यांनाही प्रतीक्षालयात बराच वेळ वाट पाहावी लागली. अखेरीस रात्री उशिरा प्रतीकात्मक पद्धतीने झेंडा दाखवून साहित्य संमेलनास शुभेच्छा देऊन त्यांनी काढता पाय घेतला. अखेर सकाळी १० वाजता गाडी आली आणि सर्वजण मार्गस्थ झाले.