शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (08:48 IST)

रोहित पवारांची अजित पवारांसोबतच्या संघर्षाला सुरुवात की राजकीय संधी?

rohit panwar
“रोहित पवार हे नवखे आहेत. अजित पवारांची जागा ते घेऊ पाहतायेत.” हे विधान आहे अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचं. “मुश्रीफांनी कोल्हापुरात राष्ट्रवादी संपवली,” या रोहित पवारांच्या टीकेला उत्तर देताना उत्तरात मुश्रीफांनी वरील विधान केलं होतं.
 
हे शरद पवारांच्या कोल्हापूरमधील सभेवेळी झालं.
 
त्यानंतर परवा बारामतीत अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. या स्वागताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आमदार अमोल मिटकरींनी लिहिलं की, “तुफान, तुफान, तुफान... तुफान आलंया. अजितदादा, हॅट्स ऑफ. सभा बारामतीला, मात्र अस्वस्थता पसरली कळवा, जामखेडमध्ये. नाद खुळा.”
 
मिटकरी हे अजित पवारांचे समर्थक मानले जातात आणि आता ते अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी होत, त्यांच्या गटाचे मुख्य प्रवक्तेही बनलेत. मिटकरींच्या ट्वीटमधील टीकेचा रोख दोन नेत्यांवर दिसतो, एक म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि दुसरे रोहित पवार.
 
एकूणच अजित पवार गटातील नेते हल्ली रोहित पवारांवर निशाणा साधताना दिसतायेत.
 
आजवर जसं शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंध चर्चेचा विषय ठरत असे किंवा अजूनही ठरतात, तसंच आता रोहित पवार आणि अजित पवारांबाबत होताना दिसतंय.
 
रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत आणि अजित पवारांच्या बंडानंतर रोहित पवारांनी ‘काकां’सोबत न जाता, ‘आजोबां’सोबत राहण्याचा निर्णय घेतलाय.
 
रोहित पवारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेऊन, आपली भूमिका एकप्रकारे स्पष्टच केलीय.
 
मात्र, तरीही रोहित पवार हे अजित पवार यांच्यासोबतचे राजकीय आणि व्यक्तिगत संबंध वेगवेगळे ठेवू पाहतात. तसे ते अनेकदा माध्यमांशी संवाद साधताना बोलूनही दाखवत आहेत.
 
पण राजकारणात एकमेकांचे स्पर्धक असलेले आणि तेही एकाच कुटुंबातल्या दोन व्यक्तींना हे शक्य आहे का? किंवा अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात आता नेमके कसे संबंध आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, पवार कुटुंबातील ‘काका-पुतण्या’ वादाचा हा पुढचा अंक आहे का?
 
या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकारांशी बातचित केली. या प्रश्नांकडे येण्यापूर्वी आपण रोहित पवार आणि त्यांच्या राजकीय वाटचालीबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
 
‘शरद पवारांसारखं किलर इंस्टिंक्ट रोहित पवारांमध्ये’
रोहित पवार हे शरद पवारांचे सख्खे भाऊ अप्पासाहेब पवार यांचे नातू आहेत.
 
रोहित पवारांची राजकीय कारकीर्द बारामतीतूनच सुरू झाली. 2017 मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे ते सदस्य बनले. त्यांचा झेडपी मतदारसंघ बारामतीतलं शिरसूफळ हा होता.
 
मात्र, दोन वर्षांनी आलेल्या म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच ‘रिस्क’ घेतली. अहमदनगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघातून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले.
 
खरंतर कर्जत-जामखेडचा भाग विखे-पाटलांच्या प्रभावाचा. पण रोहित पवारांसाठी हा भाग तसा अगदीच नवीन नव्हता. कारण रोहित पवारांचे आजोबा अप्पासाहेब पवार कधीकाळी विखे-पाटलांच्या कारखान्याचे एमडी होते.
 
मात्र, आई सुनंदा पवार यांचं या भागातील महिलांसाठीचं कामही रोहित पवारांना फायद्याचं ठरलं.
 
ही सर्व गोळाबेरीज मांडण्याचं कारण म्हणजे, रोहित पवार ज्यांच्यासमोर लढण्यासाठी उभे होते ते, भाजपचे नेते राम शिंदे हे तत्कालीन कॅबिनेट मंत्री होते. रोहित पवारांनी ‘रिस्क’ घेतल्याचं म्हटलं जातं, ती यामुळेच. ते विजयी झाले आणि ‘जायंट किलर’ ठरले.
 
या विजयावेळी बीबीसी मराठीनं ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्याशी बातचित केली होती. त्यावेळी भटेवरांनी रोहित पवारांच्या राजकारणाची तुलना शरद पवारांसोबत करत म्हटलं होतं की, “रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रमाणे राजकारण केलं. ते 6 महिने कर्जत-जामखेडमध्ये तळ ठोकून बसले होते.
 
प्रतिकूल परिस्थितीत विजय खेचून आणायचा ही पवारांची ‘किलर इंस्टिंक्ट’ रोहित पवारांनी दाखवली आहे. जिद्दीने राजकारण पुढे नेण्याची ताकद त्यांच्यात दिसते. शिवाय आजोबा अप्पासाहेबांसारखी चिकाटी त्यांच्या नातवामध्ये दिसते.”
 
‘शरद पवारांसारखं राजकारण करण्याचा प्रयत्न’
 
रोहित पवार हे राजकारणात आल्यापासून शरद पवारांसारखंच राजकारण करताना दिसतात. ते विविध संस्था-संघटना-व्यक्तींशी संबंध जोडून, आपलं स्वतं:चं असं जाळं निर्माण करण्याचा ते प्रयत्न करताना दिसतात. अर्थात, ही शिकवण त्यांना शरद पवारांकडूनच मिळालीय.
 
ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे याबाबत सांगतात की, रोहित पवारांना राजकीयदृष्ट्या तयार करण्याचं काम स्वत: शरद पवारांनी आठ-दहा वर्षांपूर्वीपासून केलंय. रोहित पवार उघडपणे राजकारणात प्रवेश करण्याआधीपासूनच शरद पवार त्यांना विविध ठिकाणी घेऊन जायचे, लोकांच्या गाठीभेटी घालून द्यायचे. शरद पवारांनी स्वत: रोहित पवारांना महाराष्ट्र समजावून देण्याचा प्रयत्न केला होता.
 
आता राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर मागे वळून पाहताना, ते ठिपके जोडता येतात आणि त्याचे अर्थ आपल्याला कळून येतात, असं शैलेंद्र तनपुरे म्हणतात.
 
शरद पवार हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात ज्याप्रमाणे राजकारणाव्यतिरिक्त इतर व्यासपीठांवर, मग ते साहित्याचं असो वा उद्योगाचं असो, तिथं दिसत असत आणि त्यातून राजकारणाच्या बाहेरही आपलं जाळं त्यांनी निर्माण केलं, त्याच पावलावर रोहित पवार पाऊल टाकताना दिसतात.
‘लेट्सअप’ या वृत्त संकेतस्थळाचे संपादक योगेश कुटे याबाबत अधिक सविस्तर सांगतात.
 
यशवंतराव चव्हाण-शरद पवार हा वारसा पुढे न्यायचा असेल, तर भाजपसोबत जाऊन चालणार नाही, हे रोहित पवारांना कळलं असून, त्यासाठी त्यांनी शरद पवारांचीच शैली त्यांनी वापरल्याचं योगेश कुटे म्हणतात.
 
योगेश कुटे हाच मुद्दा अधिक सविस्तरपणे सांगताना म्हणतात की, “यशवंतरावांना मानणारा वर्ग जसा आपोआप शरद पवारांकडे वळला, तसं शरद पवारांना मानणारा वर्ग आपल्याकडे येईल, असंही कुठेतरी रोहित पवारांना वाटत असेल, यात शंका नाही.”
 
तसंच, “हे अगदी स्पष्ट आहे की, रोहित पवारांवर काकांपेक्षा (अजित पवार) आजोबांचा (शरद पवार) जास्त प्रभाव आहे. म्हणूनच शरद पवारांनी आपलं नेतृत्त्वं महाराष्ट्रभर आणि विविध क्षेत्रात पसरवलं, तसंच रोहित पवार करतायेत. मग त्यासाठी राज्यभरात फिरणं असो, पत्रकारांशी मैत्री करणं असो, कलाकारांना भेटणं असो, इत्यादी गोष्टी ते करतात. राजकारणाच्या पलिकडच्या क्षेत्रातही स्वत:ला जोडून घेणं ही पवारांची शैली त्यांनी आत्मसात केलीय.
 
“रोहित पवार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचेही प्रश्न मांडतात, उद्योजकांच्या संघटनेवरही असतात, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मंडळातही असतात, संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावरही असतात. ते असे सर्वत्र आपली उपस्थिती लावून आपलं नेतृत्त्वं राज्यव्यापी सादर करत आहेत.”
 
आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे, म्हणजे, अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात संघर्ष आहे का किंवा निर्माण होऊ शकतो का, याकडे येऊ.
 
पवार कुटुंबात ‘काका-पुतण्या’वादाचा नवा अंक घडेल का?
कॅबिनेट मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांनी उघडपणे असं म्हणणं की, “रोहित पवार हे अजित पवारांची जागा घेऊ पाहतायेत” किंवा अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले आमदार अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या बारामतीतल्या स्वागतावरून रोहित पवारांवर निशाणा साधणं, या गोष्टींमुळे रोहित पवार आणि अजित पवार या ‘काका-पुतण्या’च्या संघर्षाची सुरुवात झालीय का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
 
‘लेट्सअप’चे संपादक योगेश कुटे म्हणतात की, “रोहित पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यामधील संघर्ष आज ना उद्या समोर येणारच होता.”
 
मात्र, असा थेट काकांशी संघर्ष टाळण्यासाठी रोहित पवार वेगळी मांडणी करताना दिसतायेत, असं योगेश कुटे म्हणतात.
 
हे सविस्तरपणे सांगताना ते म्हणतात की, “रोहित पवारांना पुढे आणण्यात शरद पवारांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे देखील रोहित पवारांचा ओढा शरद पवारांकडे आहे. त्यामुळे जुन्या फळीला अंगावर घेण्याची मानसिक तयारी रोहित पवारांनी केलेली दिसते. तरीही रोहित पवार कितीही आक्रमक झाले, तरी ते अजित पवारांवर थेट बोलत नाहीत. ते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या इतर नेत्यांवर टीका करताना दिसतायेत.”
 
रोहित पवार हे राष्ट्रवादीतल्या फुटीकडे संधी म्हणून पाहताना दिसतायेत, त्यामुळे थेट संघर्षाऐवजी याचा राजकीय वाटचालीत कसा फायदा होईल, याचाही विचार करताना दिसतायेत, असं कुटे म्हणातात.
 
मात्र, रोहित पवार आणि अजित पवार यांच्या आता वाटाच वेगळ्या असल्यानं त्यांच्यात ‘काका-पुतण्या’सारखा संघर्ष होण्याची शक्यता नसल्याची मांडणी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे करतात.
 
विजय चोरमारे म्हणतात की, “रोहित पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्षाला आजच्या घडीला तरी ‘काका-पुतण्या’चा संघर्ष म्हणता येणार नाही. याचं कारण रोहित पवारांनी बारामती सोडून कर्जत-जामखेडला स्वत:चा मतदारसंघ तयार केला, विकसित केला आणि तिथं निवडून आले. त्यामुळे मतदारसंघातला अजित पवारांसोबतचा संघर्ष त्यांनी आधीच टाळलाय.
 
“रोहित पवार सुरुवातीपासूनच शरद पवारांच्या प्रभावाखाली आहेत. आता राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर तर ते शरद पवारांच्या गटातील महत्त्वाचे शिलेदार बनले आहेत. त्यामुळे आपल्या गटाची बाजू मांडण्यासाठी रोहित पवार बोलत राहणार आणि ते अजित पवारांच्या गटाविरोधात बोलणारच. मात्र, या टीकेला लगेच ‘काका-पुतणे’ वादाचं नाव देणं घाईचं होईल. व्यक्तिगत मतभेदातून पक्षात फाटाफूट झाली असती, तर या टीकांना ‘काक-पुतण्या’चं स्वरूप देता येईल.”
 
विजय चोरमारे म्हणतात की, “रोहित पवार आणि अजित पवार यांच्या वाटाच वेगळ्या झाल्यानं दोघांमध्ये ‘काका-पुतण्या’ वादासारखा संघर्ष म्हणता येणार नाही. कारण आताचा संघर्ष हा पूर्ण राजकीय आहे.”
 
मात्र, हे निश्चित की, रोहित पवारांची आताची भूमिका ‘अजित पवारांच्या प्रभावात न राहण्याची’ आहे, असंही चोरमारे म्हणतात.
 
अर्थात, रोहित पवारांनी अशा ‘काका-पुतण्या’च्या संघर्षाचे वृत्त कायमच फेटाळले आहेत. किंबहुना, बीबीसी मराठीशी बोलताना रोहित पवार म्हणाले होते की, “अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास मला पुतण्या म्हणून आनंदच होईल, मात्र ज्या राजकीय विचारधारेसोबत ते गेले आहेत, त्याची नाराजी मनात राहीलच.”
 
पण एक प्रश्न उरतोच, तो म्हणजे, अजित पवारांसारख्या नेत्याशी संघर्षाच्या भूमिकेत राहून, रोहित पवारांना आपली वाटचाल करता येईल का? किंवा अजित पवारांसोबतच्या संघर्षाचं आव्हान ते पेलतील का?
 
‘राष्ट्रवादीतली फूट रोहित पवारांसाठी संधी’
रोहित पवारांनी सत्तेच्या कुशीत जाण्यापेक्षा संघर्षाची वाट का धरली, याबाबत बोलताना ‘लेट्सअप’चे संपादक योगेश कुटे म्हणतात की, “रोहित पवारांनी विचार करून हा निर्णय घेतलेला दिसतो. ते स्वत:ला ‘लंबी रेस का घोडा’ मानतात. आता ते अजित पवारांसोबत गेले असते, तर सत्तेत गेलेल्या इतर आमदारांपैकी एक आमदार एवढीच त्यांची ओळख उरली असती. पण आता ते शरद पवार गटातील महत्त्वाचे नेते बनलेत. रोहित पवारांना आता सत्ता तात्पुरती मिळाली असती. पण हा संघर्ष त्यांना आज ना उद्या करावाच लागला असता. हा त्यांना संघर्ष चुकणार नव्हता.”
 
कुटे पुढे सांगतात की, “यशवंतराव चव्हाण, शरद पवार हा वारसा पुढे न्यायचा असेल, तर भाजपसोबत जाऊन चालणार नाही, हे रोहित पवारांना कळलंय. खरंतर रोहित पवार स्वत: उद्योजकही आहेत. उद्योग सांभाळायचे म्हणजे सत्तेचं पाठबळ लागतं. मात्र, तरीही त्यांनी धोका पत्कारला आहे, याचा अर्थ ते तात्पुरत्या फायद्यावर लक्ष ठेवून नाहीत. ते दूरचा विचार करताना दिसतायेत.”
 
तर राष्ट्रवादीतल्या फुटीचा रोहित पवारांना फायदाच होईल, असं विजय चोरमारे म्हणतात. ते म्हणतात की, “राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे रोहित पवारांना नेतृत्त्व तयार करण्यासाठी संधी मिळालीय. आधी महाराष्ट्रभर फिरून पक्षाचं नेतृत्त्व म्हणून पुढे आणण्यास मर्यादा होत्या. आताचं पक्षावरील हे संकट खरंतर रोहित पवारांसाठी संधी आहे.”
विजय चोरमारेंच्या मुद्द्याचा धाग पकडत शैलेंद्र तनपुरे पुढे मांडणी करतात.
 
शैलेंद्र तनपुरे म्हणतात की, “शरद पवारांसोबत सातत्यानं राहून अजित पवार खुरटले, हे त्यांनी स्वत: बोलूनही दाखवलं. तसं रोहित पवारांबाबतही बोलता येईल. कदाचित अजित पवारांसोबत राहून त्यांचीही राजकीय वाढ तेवढी झाली नसती. अजित पवार ज्या पद्धतीचे थेटपणाचे राजकारण करतात, त्यात रोहित पवार बुजूनच गेले असते. कारण रोहित पवार अजित पवारांच्या तुलनेत संयमी दिसतात. ते तितके आक्रमक, अकांडतांडव करणारे दिसत नाहीत, कुणाचा अनादर करणारे दिसत नाहीत. ते अद्याप तरी जाणवलं नाहीय.”
 
तसंच, “शरद पवारांसोबत राहणं रोहित पवारांसाठी केव्हाही फायद्याचंच ठरणार आहे. कारण अजित पवारांना शेवटी त्यांच्या मुलांचेही भवितव्य घडवायचं आहे. त्यात पुतण्याला पुढे नेण्यात ते किती रस दाखवतील किंवा ते किती शक्य होईल, हा प्रश्नच आहे. हे रोहित पवारांनीही हेरल्याचं जाणवतं,” असंही शैलेंद्र तनपुरे म्हणतात.
 






Published By- Priya Dixit