'हे' योग्य नाही, अजित पवार यांनी व्यक्त केली नाराजी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाविरोधात लढणाऱ्या राज्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त केले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेने आपल्या घरातून घंटानाद, थाळीनाद केले त्याबद्दल त्यांचेही आभार मानले आहेत. परंतु लोकप्रतिनिधी आणि जनतेनं रस्त्यावर उतरून एकत्र येऊन हा घंटानाद करणे अपेक्षित नाही, तसेच सामान्य लोकांनी रस्त्यावर उतरून थाळीनाद आणि घंटानाद करणे योग्य नाही, अशा शब्दात आपली नाराजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
लोकप्रतिनिधींनी आणि प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रोत्साहन, प्रसिध्दी देणं टाळण्याची गरज आहे असे सांगतानाच कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत मात्र ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहोचवत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी करणं टाळावं असं आवाहन अजित पवार यांनी सोशल मीडियावर केले आहे.