सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 एप्रिल 2023 (21:51 IST)

अकोला: चार अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, शाळेतल्या दोन शिक्षकांना अटक

rape
अकोला जिल्ह्यात एका महिन्याच्या काळात चार अल्पवयीन मुलींचे शिक्षकांनीच लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. पण या प्रकारामुळे गावातील पालक घाबरले आहेत. अभ्यास घेतो असे सांगून लहान मुलींना ते शिक्षक एकांतात बोलवायचे आणि त्यांचे लैंगिक शौषण करायचे. हा सर्व प्रकार जिल्हा परिषदेच्या शाळेत घडला. या शाळेत दोन शिक्षक होते, दोघांनीही या मुलींचे शोषण केले असे आरोप आहेत.
 
चौथीत शिकणाऱ्या या मुलींपैकी एकीने घरी सांगितल्यानंतर शाळेत घडणारा हा प्रकार उघडकीस आला.
 
आपल्याला भूत लागले आहे असे सांगून शाळेतील वर्गात कोंडण्यात आल्याचे पीडित मुलीने सांगितले.
 
“मले भूत आहे म्हणून सांगितलं होतं एक दिवस. वर्गात कोंडलं होतं. सगळे कपडे काढले होते. हात पाय बांधले होते. मी चाबीने कुलूप खोलले, कपडे घातले,” असं पीडित मुलगी सांगते.
 
ती पुढे सांगते, “मी शाळेत जाते, तेव्हा पुढून हात लावायचे, मागून हात टाकायचे. आणि शाळेतली गोष्ट शाळेतच ठेवायची अस सांगायचे. घरी सांगलो तर झोडते.”
 
एकाच वर्गातल्या चार मुलींचं या शिक्षकांकडून गेल्या महिनाभर शोषण सुरू होतं. मुलींना एकटं गाठून शिक्षक त्यांना त्रास देत होते.
पीडितेची आई म्हणते, “घरी आल्यानंतर शाळेत जात नाही म्हणून म्हणायची. दुसऱ्या पीडितेची आई आली मायाकडं. ती सांगायला लागली माया पोरीले असं असं केलं म्हणून. ती म्हणाली तू पण तुया पोरिले विचारून पाय. तिले विचारलं तर तिनेही हो म्हटलं. मी अभ्यास दाखवायला गेली तर सर जवळ बोलवायचे. हात टाकायचे. मी विचारल्यावर कुठे काय करतो असं म्हणायचे. ती घरी सांगीन असं म्हणायची तर मारायची धमकी द्यायचे.”
 
शाळेतल्या गोष्टीत शाळेत राहू द्या असं देखील हे शिक्षक मुलींना सांगायचे.
 
अकोला जिल्ह्यात जंगलाने वेढलेल्या आणि केवळ 190 लोकवस्तीच्या या गावात पाचवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. दोन शिक्षक आणि पटसंख्या नऊ इतकी आहे.
 
या दुर्गम गावात पोहोचण्यासाठी धड रस्तेही नाहीत.
आरोपी असलेले दोन्ही शिक्षक अकोल्याहून शाळेत यायचे. या दोघांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पालक करतायत.
पीडितांपैकी एकीचे पालक म्हणतात की, “शिक्षकांची नियती चांगली नव्हती. घरच्यांनी मलाही सांगितले की, शिक्षक असा प्रकार करतात. सर लोकांनी जे केलं तर फार चांगलं केलं नाही. यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे.”
 
“शिक्षक शाळेत राहायचे, असं काही वाटलं नाही. त्याचं वय 50 ते 52 च्या जवळपास आहे. सगळे व्यवस्थित बोलायचे. रोज त्यांच्या भरोशावर मुलींना शाळेत पाठवत होतो. आता आम्ही शेतकरी माणूस त्याच्याच भरोश्यावर शाळेत पाठवायचो आम्ही. तिकडे काय करायचे काही माहित नव्हतं पडत. एक दीड, दोन महिने झाले म्हणतात अस प्रकार घडून रायला,” असंही पालक म्हणतात.
 
मुलींनी लैंगिक अत्याचार आणि मारहाणीची तक्रार केल्यानंतर या दोन शिक्षकांच्या विरोधात तालुक्याचे ठिकाण असलेल्या बार्शी टाकळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 
बार्शी टाकळीचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके म्हणतात की, “आम्हाला अशी तक्रार मिळाली की दोन शिक्षक काही अल्पवयीन मुलींशी छेडछाड करत होते. मुली घाबरल्या होत्या. मुलीची आईच्या तक्रारीवरून आम्ही विविध गुन्ह्यांअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना 10 तारखेपर्यंत ते पोलीस कोठडीत असतील.”
 
या दोन्ही शिक्षकांना बडतर्फ करण्यात आलं असून सध्या शाळेवर पर्यायी शिक्षिकेची नेमणूक करण्यात आलेली आहे.
 
Published By- Priya