शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (09:11 IST)

पूजाचा खून झालाय असा आरोप करत : संजय राठोडविरोधात चुलत आजीची पोलिसांत तक्रार

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अद्यापही पोलिसांनी तपासाची दिशा सापडलेली नाही. यातच पूजाच्या चुलत आजीने आता हा घातपाताचा डाव असल्याचा स्पष्ट केलं आहे. पूजाची आजी शांताबाई राठोड यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. शांताबाईंनी त्यांच्या जबाबात शिवसेना नेते संजय राठोड यांचंही नाव घेतलं आहे. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात पहिल्यांदाच राठोड यांचं नाव पोलीस रेकॉर्डवर आलं आहे. राठोड यांनी वन मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचं नाव पोलीस रेकॉर्डवर आलं आहे.
 
पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पुण्यात वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवला आहे. त्यांनी पोलिसांना तोंडी जबाब दिला आहे. त्यात संजय राठोड, अरुण राठोड आणि विजय चव्हाण यांची नावं घेण्यात आली आहे. जबाबाची कॉपी पोलीस देत नाहीत. मात्र आम्ही ही प्रत वाचली आहे, अशी माहिती भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे.
 
शांताताई म्हणाल्या की, विजय म्हणत होता पोस्टमार्टम होऊ देऊ नका, पोस्टमार्टम रिपोर्ट कुठे गेला, फक्त मृत्यू झाला म्हणून नोंद आहे. कितीही पळवाट काढली तरी काहीही होणार नाही. आता पुढे आले नाहीतर आमच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक नंतर मंत्री संजय राठोड एकच व्यक्ती आहे म्हणून समाज पुढे येत नाही, असंही शांताताईंनी म्हटलं आहे.
 
त्या म्हणाल्या की, अरुण राठोडला खुप मोठं आमिष दाखवलं आहे. अरुण राठोड हा त्याच्याच घरी आहे, दिवसा बाहेर असतो रात्री घरी येतो. पूजाच्या आई वडिलांनी सत्यासाठी बाहेर यायला हवं. त्यांच्या घरच्यांवर दबाव, त्यांना लेकरांची किंमत नाही. पुजाचा खून झालाय, पूजा डॅशिंग मुलगी होती, असं त्यांनी म्हटलं आहे.
 
पोहरादेवीतील महंत खरे बोलत होते. ते ठिकाण राजकारण करण्याचे नाही. मंत्र्यांना महंत सपोर्ट करत असतील तर चुकीचं आहे. महंत असे करायला लागले तर समाज काय करेल, असंही शांताताई यांनी म्हटलं आहे.
 
शांताताई म्हणाल्या की, पोलिसांवर दवाब असू शकतो. पोलिस कुणाच्या दबावात आहेत, हे आपण सांगू शकत नाहीत. जोवर कायद्याचा धाक नाही, तोवर हे असंच वातावरण राहिल. पोलिसांनाही धाक पाहिजे, असं शांताताई यांनी म्हटलं आहे. पोलिस स्टेशनच्या शेजारी एवढी पोलिस घटना घडली तरी साधी चौकशी पोलिसांनी केली नाही. मुलगी वरुन पडून मृत्यू झाला असं सांगितलं.