बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (21:16 IST)

नाशिकमधून कमीत कमी एक लाख कोटींची कृषी निर्यात शक्य : गडकरी

नाशिक हे फूडकल्चर सेंटर असल्याने या जिल्ह्यातून कमीत कमी एक लाख कोटींची कृषी निर्यात झाली पाहिजे. महाराष्ट्रात भविष्यात आठ ड्रायपोर्ट तयार करण्यात येणार असल्याने शेतमालाचा खर्च वाचेल. तसेच ड्रायपोर्टमधून थेट बांगलादेशमध्ये शेतमाल जाईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
 
सार्वजनिक वाचनालय नाशिक सावाना तर्फे दिल्लीत गुरुवारी  केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यक्षम संसद सदस्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ऑनलाईन पध्दतीने हा सोहळा पार पडला. शाल, स्मृतीचिन्ह, पुणेरी पगडी, ५० हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते. खासदार सुभाष भामरे यांनी गडकरी यांना पुणेरी पगडी परिधान केली. तर खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी मंत्री गडकरी यांना येवल्याची शाल दिली. केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह भेट दिले. त्यानंतर खासदार गोडसे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी व्हिडीओ क्लिप च्या माध्यमातून मंत्री नितीन गडकरींचा परिचय देण्यात आला.
 
केंद्रिय मंत्री गडकरी म्हणाले की, पुरस्कार दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहे. पुरस्कार स्विकारण्यासाठी नाशिकला येणार होतो. पण, कोरोना संकंटामुळे इच्छा असतानाही येता आले नाही. पुरस्कार व हार देणे हा न आवडणारा विषय आहे. ४० वर्षांत मंत्री, खासदार असताना स्वागताला कोणीही आलेले आवडले नाही. सत्कार कार्यक्रमाला जात नाही. आयुष्यात दोनदाच मनापासून हार खरेदी केले आहेत. पहिला हार अटलबिहारी वाजपेयी आणि दुसरा हार १९६३-६४ साली लता मंगेशकर यांच्यासाठी हार घेतला होता. त्या नागपूरला आल्या असताना त्यांचे गाणं लोकांनी उधळले होते. आता नागपूरला येणार नाही, अशी लता मंगेशकर यांनी प्रतिज्ञा घेतली होती. त्यांना नागपूरला आणत त्यांचा मोठा नागरी सत्कार केला. त्यासाठी स्वत: मोठा गुलाबाचा हार घेतला होता. सत्कार व सन्मान हे होत असतात. पण सावानाची प्रथा व परंपरा वेगळी आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक नाशिकमध्ये अभ्यासिका आहेत. नाशिक सांस्कृतिकनगरी आहे. सावानाने सांस्कृतिक चळवळ अखंडपणे चालविली आहे. दिग्गजांनी नाशिकला समृद्ध केले आहे. मंत्री डॉ.पवार व खासदार गोडसे यांनी अभ्यास करुन एक पुरस्कार सुरु करावा. नाशिक द्राक्ष व कांदा निर्यात करणार्‍या नाशिक विभागातील २५ शेतकर्‍यांचा नागरी सत्कार करावा. कृषी क्षेत्रातले कौशल्य, तंत्रज्ञान व ज्ञान हे महाराष्ट्रात नाशिकमधून फैलावते.