“आम्ही आमच्या मुलाबाळांसाठी आंदोलन करत आहोत. आमच्या जमिनींसाठी, शेतीसाठी, पाण्यासाठी आमच्या कोकणासाठी रिफायनरीला विरोध करतोय. पण आंदोलनादरम्यान आम्हाला मारण्यात आलं.
"हातापायाला लागलं आम्हाला. आम्हाला अक्षरश: रडवलं तिथे. गोळ्याही घेऊ दिल्या नाहीत. आम्हाला विरोध करण्याचाही हक्क नाही का?” हे सांगत असताना आंदोलक महिलेला रडू कोसळलं.
25 एप्रिल रोजीच्या आंदोलनाबद्दल बोलताना आणखी एका महिलेने आमच्याशी बोलताना सांगितलं, “पोलीस आमच्या अंगाला भिडले. माझा ब्लाऊज फाटला. आम्ही कुणाकडे दाद मागायची. सरकार आमचं आहे ना, मग आम्ही दाद कोणाकडे मागायची,” असं त्या सांगतात.
हजारो पोलिसांचा फौजफाटा, संचारबंदीचे आदेश आणि तणाव. बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेलं आंदोलन, पोलीस व्यवस्था आणि राजकारण या मुद्यांवरून कोकण धगधगतंय.
राजापूर तालुक्यात नेमकं काय सुरू आहे? आणि रिफायनरीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध का आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही बारसू आणि आसपासच्या गावात पोहचलो.
आम्ही गाव वाचवण्यासाठी हे करतोय
रिफायनरीविरोधातलं आंदोलन 1 मेपर्यंत स्थगित करण्यात आल्याने आंदोलनकर्ते आपआपल्या गावात होते. पण गावातही अंगणात बसलेल्या गावकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसत होती.
गावाबाहेरच्या फलकावरही रिफायनरी रद्द करा असे फलक लावले होते. तर एकच जिद्द रिफायनरी रद्द ही गावकऱ्यांची भूमिका असल्याचं ते आजही ठामपणे सांगत होते.
इथल्याच शिवणे गावात आमची भेट काही महिलांशी झाली. काही दिवसांपूर्वी बारसूमध्ये आंदोलनादरम्यान पोलीस आणि महिला आंदोलकांमध्ये झटापट झाली होती. या आंदोलनकर्त्या आमच्याशी बोलत होत्या.
तेल शुद्धीकरणाच्या या प्रकल्पामुळे आमच्या शेतीच्या जमिनी जातील आणि आसपासच्या गावांमधील आंबा, काजू, भात या शेतजमिनींवर प्रकल्पाचा दुष्परिणाम होईल, पाणी दूषित झालं तर मासेमारीवर परिणाम होईल, केमिकल्समुळे आरोग्य धोक्यात येईल आणि कालांतराने इथला सर्व परिसर दुषित होईल अशी भीती त्यांच्या मनात असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं.
“हे आंदोलन आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी करतोय, आमच्या मुलांसाठी, आमच्या गावासाठी करतोय,” असंही त्या भावनिक होऊन सांगत होत्या.
आंदोलनादरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर केला आणि झालेल्या झटापटीत त्यांना दुखापत झाल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणाच्या हाताला, कोणाच्या पायाला तर कोणाच्या गळ्याजवळ मार लागला हे सुद्धा त्यांनी दाखवलं.
पोलिसांनी फेटाळले सर्व आरोप, 'या महिला खोटं बोलत आहेत'
आम्ही यासंदर्भात पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनाही भेटलो. त्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. पोलिसांकडून कुठलीही मारहाण झालेली नसून आंदोलक महिला खोटं बोलत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.
रिफायनरी प्रकल्पासाठी निवडण्यात आलेली जागा बारसू या गावात आहे. 5 हजार एकरवर या प्रकल्पासाठी माती परीक्षण केलं जात आहे. ग्रामस्थांशी कोणतीही चर्चा न करता ही प्रक्रिया सुरू झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
“सरकार आमच्याशी चर्चा का करत नाही? त्यांना आमच्याशी संवाद साधायचा असेल तर त्यांनी गावागावात येऊन आम्हाला भेटायला हवं, आंदोलनस्थळी येऊन मंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं. प्रकल्प इतका चांगला आहे तर ते आम्हाला पटवून का देत नाहीत की खरंच प्रकल्प आमच्यासाठी फायद्याचा आहे?” असाही प्रश्न एका ग्रामस्थाने उपस्थित केला.
या आंदोलनात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सकाळी घरातली कामं आवरून, शेतीचं कामं आवरून काही गावातल्या महिला एकत्र जमतात आणि प्रकल्पाविरोधात आंदोलनासाठी तयार होतात.
दुसऱ्या बाजूला, सरकारचं आणि पोलिसांचं म्हणणं आहे की महिलांवर कोणताही अत्याचार झालेला नाही किंवा लाठीचार्जही केलाला नाही.
लाठीचार्ज झाला नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे यावर बोलताना महिला म्हणाल्या, “मग आम्ही खोटं बोलतोय असं सरकारला म्हणायचं आहे का? मीडिया सुद्धा खोटं बोलत आहे का? फक्त तुम्हीच खरं बोलताय?”
सरकार, प्रशासन विरुद्ध ग्रामस्थ हा संघर्ष आता वाढताना दिसत आहे. सहा दिवस आंदोलन केल्यानंतर तीन दिवस या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे. पण प्रकल्प आम्ही काहीही झालं तरी होऊ देणार नाही ही आंदोलनकर्त्यांची भूमिका ठाम आहे.
आंदोलक महिलांनी आम्हाला चावण्याचा प्रयत्न केला
दुसऱ्या बाजूला आम्ही काही महिला पोलिसांशीही संवाद साधला. बारसू येथील प्रकल्पाच्या जागेवर आम्ही पोहचलो त्यावेळी तिथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने याठिकाणी पोलीस तैनात होते.
प्रत्येक गाडीची तपासणी करूनच गाडी आतमध्ये सोडली जात होती. आम्हालाही पोलिसांच्या सुरक्षेसह या जागेला भेट देण्यासाठी परवानगी मिळाली.
आम्ही तिथे पोहचलो तेव्हा त्याठिकाणी जागोजागी पोलीस तैनात होते. पोलिसांच्या बंदोबस्तातच माती परिक्षणाची प्रक्रिया सुरू होती.
यावेळी आम्ही काही महिला पोलिसांशी संवाद साधला. महिला आंदोलकांना झालेल्या मारहाणीबाबत त्यांना विचारणा केली. परंतु त्यांचे सर्व आरोप पोलिसांनी फेटाळले. उलट आंदोलनकर्त्या महिलांवर पोलिसांनी आरोप केले आहेत.
पोलीस अधिकारी शीतल पाटील म्हणाल्या, “महिलांवर कुठल्याही प्रकारचा अत्याचार केलेला नाही. त्यांच्यावर लाठीचार्जही केलेला नाही. गुडघ्याला किंवा हाताला लागलं असलं तर ते कसं लागलं आम्हाला माहिती नाही. पुरुष अंमलदार तिथे नव्हते. महिला पोलिसांनीच त्यांना हाताळलं.”
“आम्ही आंदोलकांना सांगितलं की, हे प्रतिबंधक क्षेत्र आहे. पण त्या स्वत:च चक्कर येऊन पडण्याचं नाटक करत होत्या. महिला अंमलदार अडवण्यासाठी लाठी आडवी करत होत्या. महिला अंमलदारांना हाताला चावण्याचा प्रयत्न केला. महिला अंमलदारांना गुडघ्याला, डोक्याला लागलं आहे,” पाटील म्हणाल्या.
तर एका महिला पोलिसाला आंदोलनकर्त्यांनी ढकलून दिल्याने मार लागल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. “त्या दिवशी महिला आक्रमक झाल्या होत्या. त्यांनीही आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आले तसे आम्हाला डायरेक्ट ढकलून दिले. बॅरिकेट्स लावले होते यात मलाही पायाला आणि डोक्याला लागलं आहे.”
माती परीक्षणानंतरच ठरणार की रिफायनरी इथे होणार की नाही
बारसू गावात 5 हजार एकर जागेवर सध्या रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षण सुरू आहे. या माती परीक्षणात मातीचे नमुने गोळा केले जात असून त्यानंतर ही जागा ही जमीन प्रकल्पासाठी सक्षम आहे का असं ठरवलं जाणार आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाकडून इंजिनिअर्स इंडिया लिमिडेटकडून माती परिक्षणासाठी काम सुरू करण्यात आलं आहे.
5 हजार एकरवर 70 ठिकणी ड्रीर मारून मातीचे नमुने गोळे केले जाणार आहेत अशी माहिती इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडचे मॅनेजर व्ही. वीनोद यांनी आमच्याशी बोलताना दिली.
विशिष्ठ आकाराचे मातीचे काही कडक तुकडे नमुने त्यांनी आम्हाला दाखवले. “हे सॅम्पल्स आम्ही अहमदाबाद येथील आमच्या प्रयोगशाळेत पाठवणार. साधारण महिन्याभरात आम्हाला या जागेवरून 70 वेगवेगळ्या ठिकाणचे नमुने घ्यायचे आहेत. मग ही जमीन आणि माती रिफायनरी प्रकल्पासाठी सक्षम आहे का याचे रिझल्ट्स आम्हाला प्रयोगशाळेत टेस्टिंगनंतरच मिळतील. त्यानंतरच ठरणार की प्रकल्प इथे होऊ शकतो की नाही.” असं व्ही. विनोद यांनी स्पष्ट केलं.
यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनाही भेटलो. रिफायनरीमुळे विनाशच होणार आहे असा गैरसमज असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं.
ते म्हणाले, “27 एप्रिल रोजी इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडच्या काही शास्त्रज्ञांबरोबर बैठक झाली होती आणि त्यांनी प्रश्नांचीही उत्तरं दिली होती. आजही ग्रामस्थांना शंका असल्यास आम्ही 4 मे नंतर प्रत्येक गावात एक दिवस यानुसार नियोजन करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत.”
संचारबंदी मोडल्यास आम्ही कारवाई करू
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही यासंदर्भात आम्हाला मुलाखत दिली. महिला आंदोलकांचे आरोप धादांत खोटे असल्याचं पोलीस अधिक्षकांचं म्हणणं आहे.
ते म्हणाले, “महिला आंदोलकांची संख्या जास्त असल्याने पोलीस बंदोबस्तात 70 टक्के महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. आम्हाला कल्पना होती की असे खोटे आरोप पोलिसांवर केले जातील. आम्ही पोलिसांना सूचना केली आहे की संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळायला पाहिजे. महिलांशी बोलताना सभ्यतेने वागलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा हल्ला होऊ द्यायचा नाही असं सुरुवातीलाच सांगितलं होतं.”
“काही महिला महापुरुषांच्या प्रतिमा अंगावर घालून आल्या होत्या. त्या किती तयारीने आल्या होत्या हे यावरून कळतं. 30 व्हीडिओ कॅमेरे आम्ही लावले होते. 2 ड्रोन होते. सगळं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. त्यामुळे आमच्याकडून कुठलाही लाठीचार्ज झालेला नाही. कुठल्याही महिलेला फरफटत नेलं नाही. हे आरोप धादांत खोटे आहे. मी हे आरोप फेटाळतो. असं कोणी म्हणत असेल त्यांनी आमच्याकडे तशा तक्रारी कराव्या. कोर्टासमोर त्यांना हजर केलं त्यावेळी ते काहीच बोलल्या नाहीत.”
आता 1 मेपर्यंत आंदोलन स्थगित असून आंदोलन पुन्हा पुकारलं जाणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू असून राजापूर तालुक्यातही प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.
“यापुढेही कोणी कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्यास आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल,”असंही पोलीस अधिक्षकांनी स्पष्ट केलं.
रिफायनरीच्या मुद्यावरून राजकारण तापलं
रिफायनरीच्या आंदोलनावरून आता राजकारण सुद्धा पेटलं आहे. खासदार संजय राऊत यांनीही आरोप केलाय की, “आंदोलकांना बेदम मारहाण केली आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत आहेत की लाठीचार्ज झालेला नाही. राज्यात गोंधळ सुरू आहे. सरकारने चर्चा करणं गरजेचं आहे. 70 टक्के ग्रामस्थ आमच्या बाजूला आहे हे काय एक्झिट पोल केल्यासारखं सांगत आहे. लोक मरणासाठी रस्त्यावर करत नसेल तर सरकार अमानुषपणे वागत आहे.”
“सौदी अरेबियाच्या एका इस्लामिक ऑइल रिफायनरीसाठी हिंदुत्ववादी सरकार रत्नागिरीतल्या आमच्या मराठी माणसावर, भूमीपुत्रांवर हल्ले केले जात आहेत.”असंही संजय राऊत म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपण चर्चेला तयार असल्याचं स्पष्ट केलंय. 29 एप्रिल रोजी उदय सामंत यांनी याप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यात बैठक घेतली. दडपशाही केली जात आहे असा एक गैरसमज पसरला आहे असं ते म्हणाले.
उदय सामंत म्हणाले, “कारवाई झाली किंवा दडपशाही केली जातेय असा गैरसमज पसरवला जातोय याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांना आमचे अधिकारी देतील. शरद पवार यांना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी ब्रिफींग केलेलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही माहिती दिली आहे. आणखी काही नेते असतील ज्यांना माहिती द्यायची आहे ते ही आम्ही करू.”
“रत्नागिरी जिल्ह्यात येऊन मी सांगतोय की शेतकऱ्यांना त्रास देण्याचा कुठेही प्रयत्न होत नाही. बेरोजगारी दूर करणारा हा मोठा प्रकल्प आहे. लाठीचार्ज समूहाने केला जातो पण असा लाठीचार्ज कुठेही झालेला नाही.”असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यासंदर्भात उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
आता निवडणुकांच्या तोंडावर बारसू रिफायनरी प्रकल्पाचा विरोध चिघळणार की काही वेगळा मार्ग काढला जाणार? हे आगामी काळात स्पष्ट होईलच.
Published By- Priya Dixit