छिंदमला केले पोलिसांनी तडीपार, शिवरायांचा अपमान केला होता
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वाईट शिव्या देत अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला अहमदनगरमधून तडीपार केले आहे. पोलिसांनी अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. छिंदम हा या निवडणुकीत प्रभाग क्र – ९ मधून निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभा असून, शिवाजी महाराजांबद्दल घृणास्पद वक्तव्य करत वाद ओढवून घेतल्यामुळे पोलीस प्रशासनाने छिंदमच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. कोर्टाने त्यावर सुनावणी केली आणि त्यांनतर छिंदमला तडीपारीचे आदेश देण्यात आले आहेत.अहमदनगर महानगरपालिकेत छिंदम हा भाजप पक्षाकडून उपमहापौर या पदावर होता. एका कंत्राटदाराशी फोनवर संभाषण करत असताना त्याने शिवाजी महाराजांबद्दल अश्लिल आणि घृणास्पद शब्द वापरले. त्यामुळे संबंध महाराष्ट्रात छिंदम विरोधात संताप व्यक्त केला होता. भाजपच्या विरोधातही लोकांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे भाजपने छिंदमला उपमहापौर पदावरून दूर केला होता. त्यानंतर आता तो पुन्हा अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.