1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 एप्रिल 2021 (07:53 IST)

अंबरनाथमध्ये रेमडेसिविर अभावी रुग्णांची बिकट अवस्था

अंबरनाथ शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून पालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरनं गंभीर रुग्णांना दाखल करून घेणंच बंद केले आहे . तर खासगी रुग्णालयात इंजेक्शनसह ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे आता रुग्णांचे हाल बिकट होत आहेत. सध्या अंबरनाथ शहरात पालिकेने डेंटल कॉलेजमध्ये कोव्हीड केअर सेंटर उभारलं असून तिथल्या ५७० पैकी ४०० बेड्सला ऑक्सिजन सुविधा आहे. तर आयसीयूमध्ये १६ बेड्स असून त्यातील ७ बेड्सला व्हेंटिलेटर्स आहेत.ऑक्सिजन सुविधा असलेले सर्वच्या सर्व बेड सध्या फुल आहेत. तसंच सातही व्हेंटिलेटर्स रुग्णांना लावलेले आहेत. ज्या रुग्णांचा सिटीस्कॅनचा स्कोअर २५ पैकी १५ पेक्षा जास्त असतो, म्हणजेच ज्यांच्या फुफ्फुसात ६० टक्क्यांपेक्षा जास्त संसर्ग असतो, अशा रुग्णांना ऑक्सिजन, स्टेरॉइड्स यासोबतच तातडीने रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची गरज असते.
 
अशाप्रकारचे ३५ रुग्ण सध्या पालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. मात्र त्यांना देण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनच कुठे मिळत नसल्यानं या रुग्णांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पुढील २ दिवसात त्यांना इंजेक्शन न दिल्यास मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू ओढावू शकतो. मात्र रेमडेसिविर इंजेक्शनसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यापासून ते एफडीए, खासगी एजन्सी अशा सगळ्यांकडे मागणी करूनही आणि नगदी खरेदीची तयारी असूनही कुठेही इंजेक्शन मिळत नसल्यानं अंबरनाथ पालिका प्रशासन हतबल झालंय. त्यामुळे आता २५ पैकी १५ च्या पुढे HRCT स्कोअर असलेल्या रुग्णांना दाखलच करून घेऊ नका, अशा सूचना देण्याची दुर्दैवी वेळ नगरपालिका प्रशासनावर आलीये.
 
सरकारी कोव्हीड सेंटरची ही अवस्था असताना खासगी कोव्हीड केअर सेंटरची अवस्था तर आणखी बिकट आहे. कारण खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन सोबतच ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झालाय. सध्या जवळपास प्रत्येक रुग्ण फुफ्फुसात संसर्ग झाल्यानंतरच दाखल होत असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. शासनाने दोनच दिवसांपूर्वी थेट रुग्णालयांना इंजेक्शन पुरवण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्याची अद्याप अंमलबजावणी सुरू न झाल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी वणवण सुरू आहे.