गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जून 2022 (18:38 IST)

प्रदीप भिडे यांचं निधन, माध्यमविश्वात हळहळ

फोटो साभार- सोशल मीडिया ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं मुंबईत निधन झालं आहे. ते 65 वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होते. दूरदर्शनमध्ये अनेक वर्षं वृत्तनिवेदक म्हणून काम केलं.
 
1974 पासून त्यांनी मुंबई येथे वृत्तविभागामध्ये अनुवादक म्हणून काम करायला सुरुवात केली. तसंच कामगार विश्व, इ-मर्क या कंपनीत जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केलं आहे. 1980 मध्ये त्यांनी खार येथे प्रियंका स्टुडिओची स्थापना केली.
 
मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात 2 ऑक्टोबर 1972 ला झाली. प्रदीप भिडे 1974 पासून ते दूरदर्शनमध्ये दाखल झाले. स्मिता पाटील, भक्ती बर्वे, ज्योत्सना किरपेकर हे सगळे त्यांचे समव्यावसायिक होते. वयाच्या 21 व्या वर्षी भिडे यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली.
 
मराठी वाङमय, नाटके, कादंबऱ्या, एकांकिका या विषयांमध्ये त्यांना विशेष ऋची होती. प्रसारमाध्यमातच करिअर करावं असा त्यांचा मानस होता.
 
"एका चांगल्या वृत्तनिवेदकाला आवाजाबरोबरच भाषेवर प्रभुत्व मिळवणं गरजेंचे आहे. संस्कृत भाषा मृत मानण्याचा प्रघात असला तकरी संस्कृतमधील श्लोक पठण, उच्चारण यामुळे वाणी स्पष्ट होते. शब्दाचा उच्चार कसा येतो, मोठा शब्द बोलताना कुठे तोडायचा याचे भाषिक बारकावे असणं श्रेयस्कर.
 
"बातमी वाचताना सरळसोट वाचली तर नीरस आणि परिणामशून्य होते यासाठी शब्द भांडार हवे, बालसुलभ कुतुहुल हवं. बातम्या तटस्थपणे, पण आवाजात आवश्यक तो चढउतार, मार्दव, निर्माण करून सादर केल्या तर परिणामकारक होतात," असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.त्यांनी तब्बल 25 वर्ष वृत्तनिवेदन केलं.
 
राजीव गांधी यांच्या निधनाची बातमी त्यांच्यावर सांगण्याची वेळ आली तेव्हा
21 मे 1991 ला श्रीपेरंबुदूर येथे राजीव गांधींची हत्या झाली. तत्कालीन वृत्त संपादिका विजया जोशी यांना असशील तसा त्वरित निघून ये म्हणून सांगितलं.
 
तेव्हा ही बातमी मुंबईत वाऱ्यासारखी पसरली होती. मुंबईत स्मशानशांतता पसरली होती. तेव्हा ते पोलिसांच्या जीपने केंद्रात आले आणि कोणताही अभिनिवेश न आणता त्यांनी ही बातमी दिली होती.
 
स्टुडिओत जाण्याआधी तीनवेळा बुलेटिन वाचायचे
प्रसिद्ध वृत्तनिवेदक श्रीराम केळकर यांनी प्रदीप भिडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "प्रदीप भिडे हे महाराष्ट्राचा आवाज आणि चेहरा होते. आकाशवाणी कार्यालयाखाली भिडेसाहेबांना भेटण्यासाठी गर्दी झाल्याचं मी पाहिलं आहे. स्टुडिओत जाण्याआधी निवेदकाने तीनवेळा बुलेटिन वाचलेलं असायला हवं हा दंडक त्यांनीच घालून दिला. निवेदकाला सगळं बुलेटिन माहिती असायला हवं असा त्यांचा दृष्टिकोन असायचा. अँकर मंडळींसाठी भिडे सर म्हणजे वस्तूपाठ होते.
 
"त्यांच्यात कमालीचा साधेपणा होता. कधीही भेटले तर त्यांचा पहिला प्रश्न असायचा- सध्या काय वाचतो आहेस? त्यांच्यात जराही मीपणा नव्हता. कामाप्रती तादात्म्य पावणे म्हणजे काय हे मी त्यांच्याकडून शिकलो. ते जोपर्यंत कार्यरत होते तोवर त्यांचा फिटनेस अद्भुत असा होता. आवाज जपत असत. त्यांचं व्यक्तिमत्व रुबाबदार असं होतं," केळकर सांगतात.
 
"भिडे सर निवेदन करत होते तेव्हा महाराष्ट्रात दुसरं कोणतंही चॅनेल नव्हतं. फक्त दूरदर्शन होतं. अख्ख्या राज्याला माहिती असलेलं असा त्यांचा चेहरा आणि आवाज होता. त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं. त्यांच्या जाण्याने माध्यमविश्वाचं अपरिमित नुकसान झालं आहे", असं प्रसिद्ध वृत्तनिवेदक श्रीराम केळकर यांनी सांगितलं.