गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (20:25 IST)

मुख्यमंत्री बदलाची चर्चा निरर्थक : अजित पवार

ajit panwar
पुणे  : निवडणूक आयोग जो निर्णय देईल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. मी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
 
अजित पवार म्हणाले, विधानसभा अध्यक्षांकडे सेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. वेगळा निर्णय झाल्यास एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊन अजितदादांच्या गळय़ात राज्याच्या नेतृत्वाची माळ पडेल, अशी चर्चा सुरू आहे. त्याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊन आता 14 महिने झाले आहेत. ते मुख्यमंत्री झाल्यापासूनच याबाबत वेगवेगळय़ा चर्चा सुरू आहेत. मात्र, या सगळय़ा निरर्थक गोष्टी आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. मी केवळ विकासाचा विचार करतो. शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा मानून मी पुढे जात आहे.
 
शरद पवार गटाच्या पक्ष विरोधी कारवाईबाबत बोलताना ते म्हणाले, पक्षात त्यांना ज्या गोष्टी करायच्या आहेत, ते त्या त्यांच्या अधिकारात करत आहेत. मात्र, निवडणूक आयोगच अंतिम निर्णय देत असतो. आयोगाकडे दोन्ही बाजू गेल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी सुनावणीच्या तारखा दिल्या आहेत. सुनावणीनंतर आयोगाचा अंतिम निर्णय येईल. तो आम्हाला मान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.