शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 मे 2021 (15:33 IST)

‘स्पुटनिक व्ही’ लसीसाठी कंपनीसोबत चर्चा सुरु

राज्यात लसीकरण मोहीम सुरु असून दोन डोस सर्वाधिक नागरिकांना देण्यात महाराष्ट्राने अव्वल क्रमांकावर आहे. २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले. परंतु, लसींचा पुरवठा कमी होत असल्याने सर्वांच लसीकरण करता येत नाही आहे. त्यामुळे रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीसाठी कंपनीसोबत चर्चा सुरु आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
राज्यात लसीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रशियाची स्पुटनिक व्ही लस मागवण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राजेश टोपेंनी यावेळी दिली. रशियाची ‘स्पुटनिक व्ही’ ही लस महाराष्ट्रात मागवण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी लसीच्या दरांबाबत बोलणी सुरू आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र प्रथम आहे. महाराष्ट्राने १ कोटी ७३ लाख नागरिकांचं लसीकरण केलं. परंतु कोवॅक्सिनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. केंद्राला पत्र लिहून लसींची मागणी करत आहोत, असं देखील टोपे म्हणाले
 
लसींचा तुटवडा आणि त्यातून केंद्रांवर होणारा गोंधळ लक्षात घेता आता राज्य सरकार १८ ते ४४ या वयोगटासाठीच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील वेगवेगळे स्लॉट करून त्यानुसार लसीकरण करण्याची शक्यता आहे. हे स्लॉट वयोगट किंवा सहव्याधी यानुसार असू शकतात, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
 
१८ ते ४४ वयोगटासाठी ग्रामीण भागातल्या केंद्रांवर त्याच भागातले लोकं न जाता मेट्रो शहरांमधून ज्यांना तंत्रज्ञानाची जाण आहे अशा लोकांनी कोविन अॅपवर नोंदणी करून केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घेतलं. त्यामुळे स्थानिक भागात अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी मी बोललो. ही समस्या सोडवण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्लॉट द्यावे लागणार आहेत. मग वयोगटाचा किंवा कोमॉर्बिडिटीचा स्लॉट देता येईल. म्हणून ३५ ते ४४ या वयोगटातल्या लोकांना प्राधान्य देता येईल का? त्यातही सहव्याधी असलेल्यांना अधिक प्राधान्य देता येऊ शकेल. त्याबाबत दीड वाजता मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.