शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 8 जून 2021 (23:26 IST)

राज्यात मे महिन्यामध्ये १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार - नवाब मलिक

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात मे महिन्यामध्ये १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती अल्पसंख्याक आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 
 
महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
 
अशा विविध उपक्रमांमधून सन २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते मे अखेर ६३ हजार ५५ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. 
 
बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.  विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.
विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ८९ हजार ९३८ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरी इच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असेही मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
 
या मे महिन्यामध्ये विभागाकडे २१ हजार ७१० इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ५ हजार ४३०, नाशिक विभागात ४ हजार ९५७, पुणे विभागात ५ हजार ५०८, औरंगाबाद विभागात ३ हजार १४८, अमरावती विभागात १ हजार २५६ तर नागपूर विभागात १ हजार ४११ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. 
 
मे महिन्यामध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १० हजार ८८६ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ३ हजार ६१६, नाशिक विभागात २ हजार ७९४, पुणे विभागात ३ हजार ४४९, औरंगाबाद विभागात ८८१, अमरावती विभागात १०६ तर नागपूर विभागात ४० इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले आहेत असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.