शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 एप्रिल 2021 (21:59 IST)

राज्यातील 13 विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईनच होणार - उदय सामंत

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. सद्यस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणं अशक्य आहे.
 
त्यामुळे राज्यातील 13 विद्यापीठातील उर्वरित सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. या विद्यापीठांमध्ये कृषी विद्यापीठाचा समावेश नाही.
 
कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत विचार सुरू होता. पण कोरोना प्रतिबंधक निर्बंध आता आणखी कठोर करण्यात आले आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणं अवघड होणार आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाईनच घेण्यात येतील, असं सामंत यांनी सांगितलं.
 
परीक्षा ऑनलाईन घेत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्याची सूचना सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना केली आहे.
 
कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता विद्यापीठ, महाविद्यालये आणि संस्थाचालकांनी घ्यावी, अशी सूचना आजच्या (22 एप्रिल) बैठकीत करण्यात आली आहे.
 
13 ही अकृषी विद्यापीठांमध्ये परीक्षा थांबल्या नाहीत. काही ठिकाणी ऑफलाईन तर काही ठिकाणी ऑनलाईन स्वरुपात या परीक्षा सुरू होत्या. पण बुधवारी (21 एप्रिल) राज्यातील निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. अशा स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे
 
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास प्राधान्य द्यावे, अशी विनंती सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरूंनी केली होती. त्यामुळेच हा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
 
पण कोणताही विद्यार्थी परीक्षेस वंचित राहणार नाही, कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी, असा निर्णय झाला आहे.
 
विद्यापीठांच्या सर्वच परीक्षा म्हणजेच सर्वच वर्ष आणि सेमिस्टरच्या परीक्षा ऑनलाईन स्वरुपातच होतील.
 
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींसाठी तसंच उच्चशिक्षणाच्या दृष्टीने शिक्षण विभाग अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट करावा, अशी विनंती कुलगुरुंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे, असं सामंत म्हणाले.