जवान मंदार नलवडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
तालुका खटावं आणि गाववेटणेतील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान मंदार मानसिंग नलवडे(32) यांचे बुधवारी देशसेवेचे कर्तव्य बजावीत असताना पाहते पाचच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 12 वर्षांपूर्वी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल जी.डी.पदावर रुजू झाले. ते मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर आपल्या कर्तव्याचे निर्वाह करत होते. त्यांना अचानक हृदयविकाराच्या जोरदार झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
रात्री उशिरा त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला आणि संपूर्ण गावात शोककळा पसरली. त्यांची अंत्ययात्रा फुलांनी सजवलेल्या ट्रेक्टर मधून काढण्यात आली. त्यांचे अंत्यदर्शन करण्यासाठी जनसमुदायाने गर्दी केली होती. त्यांच्यावर बुधवारी रात्री अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना मुखाग्नी त्यांच्या वडिलांनी पाणावलेल्या डोळ्यांनी दिला. मंदार यांच्या पश्चात त्यांचे आई वडील , पत्नी, लहान मुलगा, आणि लहान भाऊ असा परिवार आहे.