शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (15:52 IST)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली आहे. सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. यावेळी सोमवारी दुपारी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत बाबासाहेब पुरंदरेंवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. यावेळी बाबासाहेब पुरंदरेंना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती.
 
रविवारी, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना न्यूमोनिया झाला असून प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात सहभागी झाले होते. इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले होते. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1764 ’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.
 
महाराष्ट्र सरकारने त्यांना सन 2015 मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.