मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (07:50 IST)

निष्पक्षपणे चौकशी व्हावी तोवर मी माझ्या मंत्रीपदापासून दूर राहेन : संजय राठोड

विरोधकांकडून माझ्या बाबतीत अतिशय घाणेरडे राजकारण करत माझे गेल्या ३० वर्षातले काम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. माझे राजकीय करिअर संपवण्याचा प्रकार या घटनेच्या निमित्ताने करण्यात आलेला आहे. म्हणूनच या संपुर्ण प्रकरणात तपास व्हावा आणि सत्य समोर यावे यासाठी मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे अशी कबुली वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. या सगळ्या प्रकरणात निष्पक्षपणे चौकशी व्हावी तोवर मी माझ्या मंत्रीपदापासून दूर राहेन असा मानस मी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवला आहे. मी स्वतः बाजूला होऊन माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. विरोधकांकडून अतिशय चुकीचे राजकारण होत असल्याची टिकाही संजय राठोड यांनी यावेळी केली. आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 
 
विरोधकांकडून अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका घेण्यात आली होती. पण खर तर विरोधकांची ही भूमिका लोकशाहीच्या विरोधातली अशी आहे. या प्रकरणात निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. कारण विरोधकांकडून चुकीच राजकारण केले जात आहे. पदावर राहून चौकशी होण्यापेक्षा पदावरून दूर राहून या प्रकरणात चौकशी व्हावी असा माझाही मानस आहे. म्हणूनच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल तोवर मी पदापासून दूर राहीन असे राठोड यांनी स्पष्ट केले.