शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जानेवारी 2024 (19:38 IST)

FTII मारहाण प्रकरणी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या प्रशासनावरच गंभीर आरोप

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (FTII) 23 जानेवारी रोजी झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर आता विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रशासनावरच गंभीर आरोप केले आहेत.
 
विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या हिंदुत्ववादी जमावाविरोधात प्रशासनाने तक्रार दाखल केली असली तरी या तक्रारीमध्ये विनयभंगासारख्या गंभीर आरोपाचा समावेश केला नाहीये, असं विद्यार्थी संघटनेनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
 
आमच्या एका विद्यार्थिनीला मारहाणही झाली. पण त्याचाही तक्रारीत उल्लेख नसल्याचं विद्यार्थी संघटनेनं म्हटलं आहे. या घटनेची तीव्रता एफआयआर आणि माध्यमांमध्येही कमी करून दाखविण्यात आली असल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
 
या आरोपांबाबत बीबीसी मराठीने FTII प्रशासनाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण अद्याप त्यांनी उत्तर दिले नाही.
 
विद्यार्थी संघटनेचे म्हणणे आहे की या सगळ्या घटनेचं सोशल मीडियावर जे चित्र उभं केलं जात आहे, ते अधिक गंभीर आहे.
 
हिंदुत्ववादी संघटनांनी या सगळ्या घटनेचं फसवं चित्र उभं केलं आहे. विद्यार्थ्यांनी कोणावरही हल्ला केला नाही, आम्ही केवळ स्वतःच्या रक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनी सगळ्या गर्दीतून स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांवर आरोप केले आणि जखमी विद्यार्थ्यासोबत हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यावरही आरोप ठेवण्यात आले, असं विद्यार्थ्यांनी म्हटलं.
 
या प्रकरणात ज्या विद्यार्थ्यांवर आरोप केले गेलेत, त्यांना मदत करण्याबाबत प्रशासनाने मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेनं केला आहे. बरीच चर्चा करून, त्यांना समजावल्यानंतर ते एफआयआरमध्ये पुरवणी आरोपांचा समावेश करायला तयार झाले आहेत.
 
त्यात महिलांवरील हल्ला आणि कॅम्पसमधील त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्याचा समावेश असल्याचं एफटीआयआय विद्यार्थी संघटनेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
 
विद्यार्थ्यांचं काय आहे म्हणणं?
बीबीसी मराठीशी बोलताना एफटीआयआयचे विद्यार्थी म्हणाले,"प्रशासनाने तक्रार दाखल केली तेव्हा जखमी झालेले विद्यार्थी मेडिकल टेस्ट साठी गेले होते. तेव्हा प्रशासनाने दाखल केलेल्या तक्रारीत या विद्यार्थ्यांना जी मारहाण झाली त्याचा उल्लेख न करता त्या ऐवजी दोन गटांमध्ये वाद झाला असा उल्लेख केला आहे. आमच्यावर हल्ला झाला. आमच्या सोबतच्या ज्या मुली होत्या त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे आम्हाला याची गांभीर्याने दखल घ्यावी असं वाटत होतं. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा पोलिसांकडे गेलो.
 
आमचं म्हणणं त्या तक्रारीत घ्यावे असे म्हणले. पण पोलिसांच्या मते नंतर दाखल झालेल्या तक्रारीला अर्थ नाही. आता जेव्हा आमचे स्टेटमेंट रेकॉर्ड होतील तेव्हाच उल्लेख करा असं त्यांनी सांगितलं आहे."
 
दरम्यान विद्यार्थ्यांनी असाही आरोप केला आहे की, प्रशासनाकडून आता विद्यार्थ्यांचीच चौकशी केली जाणार आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना विद्यार्थ्यांनी सांगितल की "आम्ही प्रशासनाला या बद्दल बैठक घेण्याची विनंती केली तेव्हा प्रशासनाने फक्त मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना बैठकीला बोलावले. या बैठकीत वरिष्ठ असा कार्यक्रम कॅम्पस वर झाला त्याबाबत नाराज आहेत अस सांगितलं. आम्ही फक्त प्रशासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे आमच्या पातळीवर अभ्यास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सिनेमा पाहणे, चर्चा, वाचन अशा स्वरूपाचा कार्यक्रम होता. पण आता प्रशासन म्हणताय की आमची चौकशी केली जाणार आहे."
 
दरम्यान या प्रकरणी आता एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्यांनी देखील एक पत्रक काढलं आहे. त्यात घडलेल्या घटनेचा निषेध करत त्यांनी पोलिसांनी चौकशी करावी आणि आणि प्रशासनाने विद्यार्थ्याचा बाजूने उभे राहावे अशी मागणी केली आहे.
 
23 जानेवारीला काय घडलं?
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (FTII) 23 जानेवारी रोजी दुपारी ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देत शिरलेल्या गटाने विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप FTII च्या विद्यार्थी संघटनेनं केला होता.
 
विद्यार्थी संघटनेने घडलेल्या प्रकाराबद्दल निवेदन प्रसिद्ध केलं होतं.
 
त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास 20 ते 25 जणांचा जमाव संस्थेमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता. ते सुरक्षा रक्षकांसोबत हुज्जत घालत होते. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी चौकशी केली, तेव्हा या गटाने त्यांनाही मारहाण केली.
 
एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मंकम नोकव्होम यांनाही या जमावाने मारहाण केली, त्यांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली असंही विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं.
 
या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेच्या 10-12 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
कलम 144 सह इतर कलामांतर्गत गुन्हा दाखल, तर हिंदुत्ववादी संघटनेच्या तक्रारीवरून एफटीआयआय चा विद्यार्थ्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल कलम 153 आणि कलम 295 (A) अंतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत.
 
21 जानेवारीला रात्री एक वाजण्याच्या सुमारास काही जण संस्थेच्या गेटसमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. पण सुरक्षा रक्षकांनी काही केलं नाही. आम्ही विचारल्यावर त्यांनी या लोकांना तिथून हुसकावलं. रजिस्ट्रार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी आमच्या सुरक्षेची हमी दिली होती, असंही विद्यार्थ्यांनी आपल्या निवेदनात नमूद केलं होतं.
 
दरम्यान, या प्रकरणी कोणी गंभीर जखमी झाले नसून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी बीबीसी मराठीला दिली होती.
 
या प्रकरणी विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेतले जातील. त्यानुसार कारवाई होतील. मात्र कारण अद्याप स्पष्ट नाही आणि हा कोणता गट हे देखील स्पष्ट नाही, असंही पोलिसांनी म्हटलं होतं.
 
FTII ने काय म्हटले होते?
घटनेनंतर FTII ने देखील निवेदन प्रसिद्ध केलं होतं.
 
या निवेदनानुसार, 23 जानेवारीला दुपारी 1.30 च्या सुमारास 12-15 जणांचे टोळके कॅम्पसमध्ये दाखल झाले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण ते बळजबरी आत घुसले आणि त्या टोळक्याने विद्यार्थ्यांनी लावलेले बोर्ड फोडले, बॅनर्स फाडले.
 
स्थानिक पोलिसांना तत्काळ बोलवण्यात आले आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. बाहेरुन आलेल्या जमावाने विद्यार्थ्यांवर हल्ला केला. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, इंस्टिट्यूटच्या सुरक्षा अधिकाऱ्यामार्फत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
 
इन्स्टिट्यूटच्या विनंतीवरुन पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. त्यांची एक तुकडी इन्स्टिट्यूटबाहेर तैनात आहे. FTII प्रशासनाने या प्रकाराची गंभीररित्या दखल घेतली आहे आणि यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे, असं FTII ने म्हटले होतं.
 
या विद्यार्थ्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्थेच्या रवींद्र पडवळ यांनी म्हटलं की, या ठिकाणी बाबरीचा फोटो असलेले होर्डिंग लावले होते आणि लोकशाहीचा खून झाला असं म्हटलं होतं.
 
हा सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे. आम्ही दहा ते बारा जण होतो. आम्ही हा बोर्ड काय आहे त्याची चौकशी करत होतो, तेव्हा हे शंभर दोनशे विद्यार्थी तिथे आले. त्यांनी आमच्यावर हल्ला केला. मग आम्ही आत गेलो आणि बोर्ड काढला, असं रवींद्र पडवळ यांनी म्हटलं.
 
या घटनेपूर्वी काय झालं?
सोमवारी (22 जानेवारी) राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पार्श्वभूमीवर एफटीआयआयमध्ये आनंद पटवर्धन यांच्या ‘राम के नाम’ या डॉक्युमेंट्री चे स्क्रिनिंग करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
‘एफटीआयआय’च्या आवारात ‘रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉनस्टिट्यूशन’ अशा आशयाचे फलक लावण्यात आल्याने तणाव निर्माण झाला असल्याचंही म्हटलं जात आहे.