सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (07:25 IST)

नोव्हेंबर महिन्यात गारठा कमी, थंडीचा जोर केव्हा वाढणार? हवामान अंदाज

cold
राज्यातील तापमानात घाट होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. यामुळे उन्हाचे चटके आणि उकाड्यापासून सुटका झाली आहे. राज्यासह देशभरात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.
 
पण, नोव्हेंबर महिन्यात तुलनेनं गारठी कमी राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात काही भागात पावसाची रिमझिम सुरुच राहणार आहे.
 
केरळ आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. केरळच्या समुद्र किनार्‍यालगत अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
नोव्हेंबर महिन्यातही पावसाची शक्यता:
गेल्या काही दिवसांत मुंबई, कोकणसह राज्यातील तापमानात बदल झाला आहे. सकाळी हवेतील गारवा वाढला आहे. यामुळे ऑक्टोबर हिटमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पण, आता नोव्हेबरर उजाडताच तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवलीसह पनवेल आणि पालघरमध्येही पहाटे गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे.
 
थंडीचा जोर केव्हा वाढणार?:
भारतीय हवामान खात्याने (IMD) मंगळवारी नोव्हेंबर महिन्याचा हवामानाचा अंदाज जाहीर केला. आयएमडीने जारी केलेल्या नोव्हेंबर महिन्यात कमाल आणि किमान तापमानात घट होणार आहे, पण थंडी कमी राहणार आहे. त्यासोबतच हवामान विभागाने पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीच्या वर जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुद्धा किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नोव्हेंबर महिनाच्या शेवटी मुंबई, ठाणेसह कोकणात थंडीचा जोर वाढणार आहे.
 
हवामान खात्याने वर्तवला अंदाज:
अलनिनोच्या प्रभावामुळे देशातील बहुतेक भागात नोव्हेंबरमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात दक्षिणेकडील काही भागात, उत्तर-पश्चिमचा बहुतांश भाग आणि पूर्व-मध्य, पूर्व आणि ईशान्येकडील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज असून या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.
 
अलनिनोचा प्रभाव, अनेक भागात पावसाची शक्यता:
पॅसिफिक आणि हिंदी महासागरांवरील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील बदलांमुळे भारतीय द्वीपकल्पातील हवामान देखील प्रभावित होते. आयएमडीनुसार, पूर्व हिंद महासागराच्या तुलनेत पश्चिम हिंद महासागराचे तापमान वाढणे आणि थंड होणे याला हिंद महासागर द्विध्रुव म्हणतात. यालच भारतीय निनो असेही म्हणतात, याचा मान्सूनवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो.