त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात हार, फुले, नारळ नेण्यास बंदी
त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला येताना हार, फुले, नारळ या वस्तूंना मंदिरात नेण्यास यापुढे बंदी करण्यात आली आहे. मंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशाबाबत ट्रस्टच्या निर्णयानंतर आता त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात भाविकांना पूजा साहित्याला मज्जाव करण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहात कोरोनामुळे पुजारी वगळता अन्य भाविकांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. त्याबाबत साधू-महंत आक्रमक झाले असतानाच आता मंदिरात फुले, नारळ, प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली आहे. कोरोना काळात जवळपास दीड वर्ष मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद होते. कोरोनाचा प्रभाव कमी होताच दरवाजे उघडले जाताच मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्र्यंबकेश्वर येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. मात्र त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी जातांना सोबत फुले, नारळ, प्रसाद घेऊन जाण्यास ट्रस्टने मनाई केली आहे.