मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (08:05 IST)

कोल्हापूर सराफ व्यापारी संघ - राजेश राठोड-माणिक जैन यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीत 14 जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात राहिले आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सहा जणांनी माघार घेतली. अध्यक्षपदासाठी राजेंद्र सु. ओसवाल यांनी माघार घेतल्याने, राजेश राठोड आणि माणिक जैन यांच्यात थेट लढत होणार असून उपाध्यक्षपदासाठी तिघांजणात सामना होणार आहे. निवडणुकीसाठी 10 एप्रिलला मतदान होणार असून दुसऱया दिवशी 11 एप्रिलला मतमोजणी आहे.
 
कोल्हापूरच्या सराफ व्यावसायिकांची शिखर संघटना म्हणून सराफ असोसिएशनकडे पाहिले जाते. विद्यमान अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्यासह इतर संचालकांच्या कार्यकारिणीच कार्यकाळ सहा महिन्यांपूर्वी संपला होता. त्यानंतर आता निवडणूक होत आहे. निवडणूक पुढे ढकलली जात असल्याचेही आरोपही झाले होते. तसेच संघाच्या सभेत वादाचेही प्रसंग घडले होते. त्यानंतर निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक अधिकारी कांतीलाल ओसवाल यांच्या नेतृत्वाखाली प्रक्रियाही सुरू झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष या दोन जागांसह कार्यकारी मंडळ सदस्य अर्थात संचालकपदाच्या 12 जागा अशा 14 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. 65 अर्जांची विक्री झाली होती. पण प्रत्यक्षात 29 जणांनी अर्ज दाखल केले होते. सोमवारी अर्ज माघारीचा शेवटच्या दिवशी 6 जणांनी माघार घेतल्याने 23 जण प्रत्यक्षात निवडणूक रिंगणार राहिले आहे.
 
अध्यक्षपदासाठी राठोड-जैन यांच्यात लढत
अध्यक्षदासाठी राजेश राठोड आणि माणिक जैन व राजेंद्र सु. ओसवाल यांचे अर्ज आले होते.यापैकी ओसवाल यांनी माघार घेतल्याने, दोघांचेच उमेदवारी अर्ज शिल्लक राहीले. त्यामुळे या दोघांतच थेट लढत होणार आहे. उपाध्यक्षपदासाठी अनिल पोतदार-हुपरीकर, विजय हावळ व सुहास शशिकांत जाधव यांच्यात सामना होणार आहे. संचालक मंडळातील 12 जागांसाठी 18 जण रिंगणात राहिले आहेत. त्यामध्ये सुशिल आग्रवाल, अशोककुमार ओसवाल, कुमार ओसवाल, प्रीतम ओसवाल, भैरू ओसवाल, ललित ओसवाल, प्रसाद कालेकर, किरण गांधी, ललित गांधी, संजय चोडणकर, तेजस धडाम, सिद्धार्थ परमार, शिवाजी पाटील, सुरेश पेडणेकर, शीतल पोतदार, विश्वास बारस्कर, विजयकुमार भोसले, संजय रांगोळे.

चौकट 691 मतदार करणार मतदान
सराफ संघाच्या या निवडणुकीत 769 मतदार होते. त्यातील मयत 4, वर्गणी न भरलेले 34, अपात्र व रद्द असे 10 सभासद असे एकूण 78 सभासद अपात्र ठरले आहेत. त्यामुळे 691 सभासद प्रत्यक्षात 14 जागांसाठी मतदार करणार आहेत. प्रत्येक मतदाराला 14 मते देण्याचा अधिकार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक पदासाठी वेगवेगळय़ा अशा 3 मतपत्रिका आहेत.