सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 सप्टेंबर 2022 (11:22 IST)

Lumpy Skin Disease : सावधान! लम्पी त्वचा रोगाचं महाराष्ट्रात थैमान,लंपीग्रस्त जनावरांसाठी विलगीकरण केंद्र करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली

देशातील आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात ‘लम्पी स्किन रोगामुळे (Lumpy Skin Disease )आतापर्यंत 7300 हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मोठा चिंतेचा विषय बनला आहे. लम्पी स्किनचा आजार (Lumpy Disease) झालेले जनावरांना ताप येतो. जनावरे चारा देखील खात नाही. त्यांची दूध उत्पादन क्षमता देखील घटते.
 
लम्पी आजारामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 39 जनावरे दगावली आहेत. त्यात पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील जनावरांचा समावेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु लम्पी स्किन आजार जनावरांप्रमाणे माणसांनाही होतो का? असा सवाल उपस्थित होत आहे.
 
सध्या लम्पी त्वचा रोगामुळे पशुपालकांसह इतर नागरिकांमध्ये देखील धडकी भरली आहे. लम्पी त्वचा रोग हा माणसांमध्येही संक्रमित होऊ शकतो काय, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, हा आजार केवळ जनावरांमध्ये संक्रमित होऊ शकतो, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. लम्पी त्वचा रोग नागरिकांमध्ये पसरत नाही.तसेच लम्पी आजार झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात असलेल्या नागरिकांना देखील त्याचा धोका नाही, अशी माहिती देखील समोर आली आहे. लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे. या आजारामुळे मृत्यू दर 1 ते 2 टक्के आहे
 
कशामुळे पसरतो लम्पी त्वचा रोग?
लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग कीटकांपासून पसरतो. माश्या आणि डास तसेच विशिष्ट प्रजातीच्या उवांमुळे लम्पी आजार पसरतो.
काय आहेत या आजाराची लक्षणे?
लम्पी त्वचा रोग झालेल्या जनावरांमध्ये ताप येणे, चारा न खाणे, त्वचेवर गाठी येणे अशी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. तसेच डोळे आणि नाकातून स्त्राव येणे, तोंडातून लाळ गळणे, दुध उत्पादन कमी होणे, अशी लक्षणे आढळून येतात. या अशी लक्षणे दिसून येतात. या आजारामुळे जनावरे दगावताही.
 
काय काळजी घ्याल?
*  गोठ्यात माशा, डास होणार नाही याची काळजी घ्यावी.
*  जनावरांवर उवा दिसत असल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय करावे.
*  गोठ्यात स्वच्छता राखावी.
*  निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून विभक्त ठेवावे.
*  बाधित जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये.
*  गायी आणि म्हशींना वेगवेगळ्या ठिकाणी बांधावे.
 
लंपीग्रस्त जनावरांसाठी विलगीकरण केंद्र करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 
जनावरांमधील लंपी आजाराचा शिरकाव गुजरात, राजस्थाननंतर महाराष्ट्रातही झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झालंय. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यन्वित झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल माहिती दिली की, महाराष्ट्रात लंपीग्रस्त जनावरांसाठी विलगीकरण केंद्र निर्माण केले जातील.
 
"लंपीच्या बाबतीत राज्य शासन अतिशय गंभीर आहे. आमचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांची टीम यावर काम करत आहे. सर्व अधिकारी, डॉक्टर, पशुपालन विभागाला सविस्तर सूचना दिलेल्या आहेत आणि लस देखील मोठ्याप्रमाणवर उपलब्ध केलेली आहे. डॉक्टर देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध केले आहेत. कुठेही लशीचा तुटवडा नाही," अशीही माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.