1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 (08:23 IST)

राज्यातील शाळांमध्ये राबविणार ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ उपक्रम

shinde panwar fadnavis
मुंबई, : राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमातून इयत्ता आठवी पर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी व आनंददायी वाचनातून ‘शिकण्यासाठी वाचू शकेल’, अशी चळवळ विविध सामाजिक स्वयंसेवी संस्था व घटकांच्या सहभागातून निर्माण करण्यात येणार आहे.
 
युनिसेफ, प्रथम बुक्स व रीड इंडिया यांच्यासह राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. इयत्ता तिसरी पर्यंत च्या प्रत्येक मुलांमध्ये वाचन कौशल्य निर्माण करतानाच वयोगटांनुसार मुलांना मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे . यातून त्यांच्यावर चांगले संस्कार होतानाच मराठी भाषेचा नवीन वाचक वर्ग देखील तयार होईल, मुलांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवण होईल.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे. या उपक्रमास गती देण्यासाठी ब्रँड अँबेसिडर नेमणूक करणे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, मीडिया प्लॅटफॉर्मचा सहभाग घेणे व लोकांच्या प्रयत्नांना प्रसिद्ध देण्याचे काम केले जाईल. वाचनासाठी खास 15 ते 20 मिनिटे ठेवत शाळांच्या वेळापत्रकात आनंदाचा तास सुरू करण्यात येणार आहे. यासह रीड इंडिया सेलिब्रेशन,  ग्रंथोत्सव व पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित कार्यालय जातील .
 
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने २२ नोव्हेंबर २०२३ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.  शाळांना व शासकीय ग्रंथालयांना यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावयाची असून त्यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जाणार आहे.