शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (07:28 IST)

महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, आता या तीन पक्षांच्या सरकारचा पंचनामा करायची वेळ आली आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना देखील तालुक्यातील शिवसेनेस आम्हास न्याय द्यावा म्हणून प्रशासनाविरुद्ध मोर्चा काढावा लागतो. त्यामुळे हे सरकार बिघाडी सरकार आहे, अशी टीका माजी सहकार मंत्री तथा भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली. इंदापूर पंचायत समिती ते तहसील कार्यालयावर हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाविकासआघाडी सरकार, तालुका लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेचा निषेध करत पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
 
पाटील पुढे म्हणाले, ''महिलांवरील अत्याचार, कोविड रूग्णांना सुविधा, कर्जमाफी योजना, शेती पिकांना नुकसानभरपाई, मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षण देण्यात हे सरकार व लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या 15 जूननंतर करू नयेत असा नियम असताना राज्य सरकार हे अर्थपूर्णपणे बदल्या करत आहे. तालुक्यात बांधकाम खात्याचा राज्यमंत्री असूनही रस्त्यांची वाट लागली आहे. कोरोना महामारीची गंभीर परिस्थिती असतानाही वन खात्याकडून जनतेचे जनजीवन उध्वस्त केले जात आहे. इंदापूरात कोरोना रुग्णांना शासन बेडशीट देऊ शकत नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व इतर सुविधा देण्यास लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. नितीन गडकरी यांनी पालखी मार्गासाठी निधी दिला आहे, मात्र गोखळी ते लुमेवाडी दरम्यान जाणूनबुजून भरपाई संदर्भात नोटीस देण्यात विलंब केला जात आहे.''
 
यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष शरद जामदार, मारुती वणवे, तानाजी थोरात, माऊली चवरे, शीतल साबळे, उज्वला घोळवे यांची भाषणे झाली. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले.  
 
यावेळी भाजप शहराध्यक्ष शकिल सय्यद, मंगेश पाटील, मयूरसिंह पाटील, दिपक जाधव, प्रदीप पाटील, महेंद्र रेडके, दत्तात्रय शिर्के, रघुनाथ राऊत, शेखर पाटील, कैलास कदम, धनंजय पाटील, किरण पाटील, राम आसबे, सचिन आरडे, नानासाहेब गोसावी, शिवाजी तरंगे, आबा शिंगाडे, सुभाष काळे, राजकुमार जठार, पिंटू काळे, सचिन सावंत, अमोल इंगळे, दादा पिसे, ऍड आसिफ बागवान, चाँद पठाण, घन:शाम पाटील, गणेश घाडगे उपस्थित होते.
 
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे त्वरित पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदर गिरीष बापट यांच्यासह पुण्यात भेट घेणार असल्याची माहिती यावेळी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.