मुंबई देशातील सर्वांत महागडे शहर
भारताची आर्थिक राजधानी मुंबई हे देशातील सर्वांत महागडे तर जगातील ५७ वे शहर असल्याची माहिती समोर आली असून मुंबईमध्ये अनेक गोष्टींच्या दरामध्ये वाढ झाली असून, महागाई ४.८१ टक्क्यांवरून ५.५७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. ही माहिती मर्सर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये समोर आली आहे. अंगोलाची राजधानी ल्युएण्डा या यादीत जगातील सर्वांत महागडे शहर ठरले आहे. दुसऱ्या स्थानावर हाँगकाँगचा क्रमांक लागतो. टोकियो, झ्युरिक आणि सिंगापूर ही शहरे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. या यादीत दिल्ली ९९ व्या क्रमांकावर आहे.
दरवर्षी जगभरातील शहरांमधील जीवनावश्यक खर्चाबाबत मर्सर संस्थेतर्फे सर्वेक्षण केले जाते. यंदा केलेल्या सर्वेक्षणात मुंबई ५७ व्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात महाग शहर अँगोला या देशाची राजधानी असलेल्या ल्युएण्डा हे शहर ठरले आहे. सर्वेक्षणात हे शहर प्रथम स्थानावर आहे. भारताचा विचार केल्यास पर्यटकांसाठी मुंबई सर्वात खर्चिक ठरत आहे .
या सर्वेक्षणात नवी दिल्ली ९९ व्या स्थानावर आहे, तर चेन्नई (१३५), बंगळूरु(१६६), कोलकाता (१८४) या शहरांचाही समावेश आहे . मुंबईने या क्रमवारीत ऑकलँड (६१), डल्लास आणि पॅरिस (६२), कॅनबेरा (७१), सीटल (७६), आणि व्हिएना (७८) या शहरांना मुंबईने मागे टाकले आहे. मुंबईमध्ये जेवण आणि हॉटेलचा खर्च सर्वाधिक आहे.