शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जून 2022 (21:53 IST)

हत्यासत्र सुरूच: नाशिकच्या अंबड एमआयडीसीमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्याचा खून…

murder
नाशिक शहरातील खुनाचा सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाही.आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये खुनाची घटना समोर आली आहे.नाशिकच्या अंबड परिसरात एकाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे.नंदकुमार आहेर (वय ५०) असे मयत झालेल्या इसमाचं नाव आहे.मंगळवारी (दि. ७) घडलेल्या या घटनेत नंदकुमार आहेर हे सकाळी १० वाजेच्या सुमारास अंबड औद्योगिक वसाहतीतील सीमेन्स कंपनीकडून गंगाविहारकडे जात असताना सीमेन्सजवळील आहेर इंजिनिअरिंग कंपनी (एफ १८/२) येथे आपल्या गाडीतून उतरत होते. यावेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारी व कोयत्याने सपासप वार करून पलायन केले. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या आहेर यांना कंपनीतील कर्मचार्‍यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना दुसर्‍या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.
 
मागील अठरा दिवसांत आठवी हत्या असून यामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आहेर हे इंजिनिअरिंग कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून कार्यरत असल्याचे समजते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दखल करण्याचे काम सुरु आहे. मात्र या घटनेने नाशिकची गुन्हेगारी किती फोफावत चालली आहे, हे यावरून दिसून येते.
 
अठरा दिवसांत आठ हत्या:
नाशिक शहरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करूनही काहीच बदल झाला नसल्याचे या घटनेवरून लक्षात येते. मागील 18 दिवसात 08 हत्या झाल्याने नाशिक हादरल आहे. तर गेल्या 02 दिवसात 03 जणांवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.