शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (22:13 IST)

अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा

''चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे. कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा, अशी उपहासात्मक टीका करीत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी भाजपचे प्रदेशाद्धक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत त्यांना टोला लगावला आहे.
 
देवेंद्र फडणवीस हे दबंग नेते आहेत, आणि ते १०० अजितदादा पवार खिशात घेऊन फिरतात, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की चंद्रकांत दादा हे महाराष्ट्राला पडलेले एक गोड स्वप्न आहे . चंद्रकांतदादा हे सध्या महाराष्ट्राला निखळ मनोरंजन आणि आनंद देतात म्हणून राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना माझी विनंती आहे की, दादा आपण चंद्रकांत दादा पाटलांवर करमणूक कर लावावा. तसेही केंद्र सरकार आपल्या राज्याचे जीएसटीचे पैसे आपल्याला देत नाहीये.  किमान चंद्रकांत पाटलांच्या करमणूक करामुळे आपल्या राज्याचा काही भार हलका होईल, अशी उपहासात्मक टीका चाकणकर यांनी केली आहे.