बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (10:44 IST)

National Anthem :राज्यात आज 11 वाजता 'सामूहिक राष्ट्रगीत गायन' उपक्रमात सहभाग घेण्याचं नागरिकांना आवाहन

devendra fadnavis eaknath shinde
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात 17 ऑगस्ट 2022 ला सकाळी 11 ते 11.01 मिनिटे या कालावधीत नियोजित ‘सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात’ सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम निर्माण करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
 
नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्रगीताविषयी असणारी पवित्र भावना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून एका अनोख्या विक्रमाद्वारे साऱ्या जगासमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (National Anthem) या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी लहान – थोर, स्त्री – पुरुष असा कोणताही भेद न ठेवता सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.
 
यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्तानं देशात 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव' सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या 'स्वराज्य महोत्सवाचे' आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
 
आज म्हणजेच बुधवारी सकाळी 11 वाजता राज्यात सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन होणार आहे. राष्ट्रगीताच्या या समूह गायनामध्ये राज्यातील सर्व अबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा असेही एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले आहे. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत.
 
सरकारने सर्व विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी सामूहिक राष्ट्रगीत गायन अनिवार्य केलं आहे. राष्ट्रगीतासाठी विद्यार्थ्यांना मोकळ्या मैदानात एकत्र येण्यास सांगण्यात आलं आहे.
 
राज्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना निर्देश देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे. सामूहिक राष्ट्रगीत गायनासंदर्भात राज्य शासनाने सविस्तर शासन निर्णय जारी केला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. 
 
राज्यातील अंगणवाड्या, सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची विद्यापीठे, खाजगी, शासकीय सर्व शैक्षणिक संस्था मधील विद्यार्थी, व्यापारी प्रतिष्ठाने, सेवा पुरवठादार, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच राज्यातील इतर सर्व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे.  असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.