मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (09:35 IST)

ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूट मध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो : भुजबळ

chagan bhujbal
गायकवाड जे बोलले ते मी ऐकलं, ते ऐकून मलाही वाईट वाटलं. त्यांनी जी भाषा वापरली ती बरोबर नाही. मला त्यांना फक्त एवढंच सांगायचय, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूट मध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहिजे ‘ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी  संजय गायकवाड यांना इशारा दिला आहे. .
 
भुजबळ म्हणाले की,  राहता राहिला त्यांनी वापरलेल्या भाषेचा प्रश्न तर त्याबद्दल त्यांचे नेते आहेत एकनाथ शिंदे, ते बघून घेतील. कमरेत लाथ घालून मला बाहेर काढा, अशी भाषा त्यांनी वापरली. मला मंत्रीमंडळात घ्यायचं की नाही बाहेर काढायचं, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्य आहे.
 
दुसरी जी गोष्ट आहे कमरेथ लाथ घालण्याची , ते काही ते करणार नाहीत, कारण त्यांनाही कल्पना आहे, त्यांचे जे गुरू आहे आनंद दिघे आणि इतर मोठ्या शिवसेना नेत्यांचा नेता म्हणून मी काम करत होतो. त्यामुळे अशी लाथ-बिथ घालणं, अशा प्रकारची भाषा करणं, हे योग्य नाही, हे त्यांना निश्चितपणे समजतं ‘ असं छगन भुजबळांनी सुनावलं.
 
मला कोणत्याही पदाची हौस नाही 
छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचं ट्विट अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यावरही भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं.  मला अजून भाजपच्या ऑफरबद्दल काही माहिती नाही. दमानियांना कशी काय माहिती मिळाली? हे मला माहीत नाही. मला कुठल्याही पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसी समाजासाठी काम करत आहे. मला आता नवीन काही पाहिजे, असं काही नाही. असं कोणतही प्रपोजल मला आलेलं नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी काही घुसमट होत नाहीये, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

Edited By -  Ratnadeep ranshoor