शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' असे नवे नाव, निवडणूक आयोगाने मान्यता दिली

sharad panwar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नवे बॉस आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार झाले आहेत. तर आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला नवे नाव दिले आहे. शरद पवारांच्या गटाचे नाव आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार’ म्हणून ओळखले जाणार आहे.
 
निवडणूक आयोगाने मंगळवारी अजित पवार यांना राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्ह दिले. राष्ट्रवादीचे नाव आणि 'घड्याळ' हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवार गटाने जोरदार टीका केली आहे. आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
 
अजित पवार गटानेही राष्ट्रवादीच्या मुंबईतील मुख्यालयावर दावा केल्याचे वृत्त आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी अजित पवार गटाला खऱ्या राष्ट्रवादीचा दर्जा दिला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला 'घड्याळ' हे राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्हही आयोगाने दिले आहे.
 
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शरद पवार गटाने आज तीन पर्याय सुचवले होते. निवडणूक आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' या नावाला मान्यता दिली आहे. आता शरद गट या नव्या नावाने राज्यसभा निवडणूक लढवणार आहे. मात्र चिन्हाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
 
1999 मध्ये काँग्रेसपासून फारकत घेतल्यानंतर शरद पवार यांनी इतर काही नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा निर्णय राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.