मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (08:45 IST)

लातूरमध्ये गॅसच्या स्फोटात एक ठार, सात लहान मुले गंभीर जखमी

लातूर : शहरामध्ये फुग्यात हवा भरणा-या गॅसचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाला असून सात लहान मुले गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या लहान मुलांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरु करण्यात आले आहे. लातूर शहरातील तावरजा कॉलनी भागातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान यामध्ये फुगे विक्रेत्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
 
लातूर शहरातील तारवजा कॉलनीमध्ये रविवार दि. 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या वेळेस ही धक्कादायक घटना घडली. त्यावेळी गॅसवरचे फुगे विकणारा एक व्यक्ती त्याच्या दुचाकीसह तारवजा कॉलनीमध्ये आला होता. त्याच्यासोबत फुग्यात हवा भरणारा गॅस सिलिंडर देखील होता. फुगेवाला आल्याचे पाहून मुलांनी त्याच्या भोवती एकच घोळका केला. जवळपास सात ते आठ मुले यावेळी तिथे हजर होती. पण अचानक त्याच्या सिलिंडरचा स्फोट झाला. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेली लोकं देखील घाबरली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
 
पण यामध्ये त्या फुगेविक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याच्या जवळ असेलेली सात ते आठ लहान मुले देखील या स्फोटामध्ये गंभीर जखमी झाली. यामधील दोन मुलांना अतिशय गंभीर अशी इजा झाली आहे. तर इतर सात मुले देखील तीव्र दुखापतग्रस्त आहेत. या घटनेची माहिती मिळताच विवेकानंद पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुधाकर वावकर आणि त्यांच्या दोन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर रुग्णवाहिका देखील तात्काळ हजर करण्यात आली.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor