मनमाड रेल्वे स्थानकालगतच्या अंकाई स्थानकातून मालगाडीद्वारे कांदा पाठविण्यात आला..
मनमाडचा कांदा हिंसाचार ग्रस्त असलेल्या मणिपूरला पोहोचला आहे. जवळपास ८०० टन कांदा घेऊन २२ डब्यांचा रॅक मणिपूरच्या खोंगसोंगला या स्थानकावर पोहोचला आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या ठिकाणी हिंसाचार सुरू आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने या कांद्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना आधार मिळणार आहे.
नाशिक जिल्हा कांद्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकालगतच्या अंकाई स्थानकातून मालगाडीद्वारे कांदा पाठविण्यात आला आहे. अंकाई स्थानकातून कांदा भरून निघालेली ह्या मालगाडी २८०१ किलोमीटरचे अंतर कापले आहे. हि रेल्वे सोमवारी (२४ जुलै) रोजी दुपारी चार वाजता मणिपूर राज्यातील खोंगसोंग रेल्वे स्थानकात सशस्त्र पोलीस बंदोबस्तात दाखल झाली आहे. मुख्य म्हणजे या घटनेची दखल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही घेतली होती. प्रथमच ईशान्य रेल्वेत मिश्र माल वाहतूक जिवनावश्यक वस्तू यात बटाटा, तांदुळ, साखर, कांदा आणि इतर खाद्य पदार्थ घेऊन ही रेल्वे मणिपूर येथे दाखल झाली. देशात सर्वदूर जिवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी भारतीय रेल्वे कटिबद्द असल्याची ग्वाही या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
गेल्या तीन महिन्यानापासून मणिपूर मधील हिंसाचारामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारामुळे जीवन आवश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने, तेथील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. देशभरातून लोक मणिपूरला मदत करण्यासाठी सरसावले असून, राज्यातील सरकारने मणिपूरला विविध वस्तू मदत स्वरूपात पाठविल्या आहेत.