महाराष्ट्रात 17 हजार 471 पदांची पोलीस भरती लवकरच
पोलिस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील रखडलेल्या पोलिस भरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून तब्बल शिपाई संवर्गातील १७,४७१ जागा भरण्यासाठी राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. या भरतीची परीक्षा ओएमआर अथवा ऑनलाइन होणार आहे. गृह विभागाने शंभर टक्के रिक्ते पदे भरण्यासाठीचा शासनादेश निर्गमित केला आहे.
सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील ३१ डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत राज्याच्या पोलिस दलातील पोलिस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलिस शिपाई, बॅण्डस्मन, पोलिस शिपाई चालक, सशस्त्र पोलिस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत.
वित्त विभागाने ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत
अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास मान्यता दिली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने पोलिस शिपाई संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे भरण्याकरिता वित्त विभागाच्या ३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीमधून सूट देण्यात आली आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor