शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 22 मे 2022 (14:27 IST)

राज ठाकरे अयोध्या दौरा आणि औरंगजेबाच्या कबरीविषयी म्हणाले...

Raj Thackeray
निवडणुका नाही काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करायचं, असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे.
 
पुण्यात एसपी महाविद्यालय आणि नदी पात्रात सभा न घेता गणेश कला क्रीडा मंचमध्ये सभा का घेत आहोत, हे भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी सांगितलं.
 
अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर राज ठाकरेंनी आज पुण्यात सभा घेतली. या सभेत अयोध्या दौऱ्याविषयी बोलताना राज यांनी म्हटलं, "ज्या दिवशी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली त्यादिवशी अयोध्येला जाणार ही तारिख जाहीर केली. तेव्हा येऊ देणार नाही असं तिकडे सुरू झालं. माझ्या लक्षात आलं की या सापळा आहे. त्याची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली.
 
"अयोध्येला जायचा विचार मनात होता. रामजन्मभुमीचं दर्शन घ्यायचं होतं. याशिवाय जिथं सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं. त्यांची प्रेत शरयू नदीत तरंगतानाचे दृश्य डोळ्यासमोरुन जात नाही. तिथंही जायचं होतं.
 
"मी सांगितले की माझी पोरं मी हकनाक घालवणार नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. हा एक ट्रॅप होता. एक खासदार उठतो आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो हे शक्य आहे का? 12 ते 14 वर्षांनंतर आठवण झाली? यातून चुकीचे पायंडे पडतात हे लक्षात ठेवावं."
 
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा, राणा दाम्पत्य, मुख्यमंत्र्यांची सभा, औरंगजेबाची कबर या विषयांना हात घातला.
 
राणा दाम्पत्य
राणा दाम्पत्य मध्येच उठलं. मातोश्री बंगला ही काय मशिद आहे का? तिथं हनुमान चालिसा म्हणायला. मग त्यांना अटक केली. मधू इथे आणि चंद्र तिथे असं झालं.
 
एवढा राडा झाल्यावर लडाखमध्ये संजय राऊत आणि राणा एकत्र जेवताना दिसले. शिवसेनेला काहीच वाटलं नाही? हो सगळे ढोंगी आहेत. खरं हिंदुत्व काय आहे याचे रिजल्टस हवेत लोकांना. जे आम्ही देतोय.
 
उद्धव ठाकरे यांच्या सभेवर
उद्धव ठाकरेंनी एक सांगावं तुमच्यावर एकतरी आंदोलनाची केस आहे? परवा मुख्यमंत्री म्हणाले, संभाजीनगर झालं काय, नाही झालं काय? मा बोलतोय ना? अरे पण तू कोण आहेस?
 
पंतप्रधान मोदींना माझी विनंती आहे की, औरंगाबादचं नाव लवकरात लवकर संभाजीनगर करा. ध्रुवीकरणासाठी MIM पक्षाला मोठं केलं. निजामाच्या औलादी महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या.
 
औरंगजेब आणि एमआयएम
औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवतात. आपल्याला लाजा वाटत नाही. राज्यकर्तेच तसे आहेत. शरद पवारांना औरंगजेब संत वाटायला लागला काय? औरंगजेब राज्य विस्तारण्यासाठी आला होता असं सांगितलं जातं. तुमच्या फायद्यासाठी चुकीचा इतिहास का सांगता?
 
एमआयएमचा माणूस औरंगजेबाच्या कबरीवर गेल्यावर महाराष्ट्र खवळेल असं वाटलं, पण काही नाही. थंड पडला महाराष्ट्र.
 
अफजलखानची मशिद ऊभी राहिली. त्याच्याचसाठी फंडींग येतं. कोण देतं फंडिंग? याचं कारण आम्ही शांत आहोत. आम्हाला काहीच पर्वा नाही.
 
मशिदीवरचे भोंगे
भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सकाळच्या अजान बंद झाल्या. मशिदीवरचे भोंगे सुरू होतील. ते तुम्हाला चेक करतायेत. अता सुरु केलंय ना, एकदाचा तुकडा पाडून टाका.
 
भोंग्याच्या प्रकरणामुळे मनसेच्या 28 हजार कार्यकर्त्यांना नोटिसा गेल्या. हिंदू पोरांवरती केसेस टाकल्या जात आहेत.
 
पुढची योजना
लवकरच मी एक पत्र देणार आहे. भोंगा आंदोलन सुरु ठेवायचंय. हे पत्र घरोघरी पोहोचवाल ही अपेक्षा. माझ्यावरची शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी एक दीड महिन्यांनी परत तुमच्यासमोर येईल आणि मला का वाटतं ते सांगेल.
 
याआधी काय घडलं?
राज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्येला जाणार होते. त्यांच्या या दौऱ्याला उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी प्रखर विरोध केला होता.
 
राज ठाकरे यांनी 20 मे रोजी ट्वीट करून सांगितले की अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर बोलूच असे त्यांनी म्हटले होते.
 
राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा तुर्तास रद्द केला आहे. राज ठाकरे यांनी स्वतः ट्वीटरवर याची माहिती दिली होती.
 
राज यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, राज यांच्या पायावर येत्या काही दिवसात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे अयोध्या दौरा रद्द करण्यात आला आहे.
 
राज ठाकरे यांच्या पायावर या आधीही काही महिन्यापूर्वी शस्रक्रिया झाली होती.
 
राज ठाकरे गेल्यावर्षी मार्चमध्ये टेनिस खेळताना पडले होते. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर पायाचं दुखणं सुरू झालं. एप्रिल महिन्यात त्यांनी ऑपरेशन केलं होतं.
 
पण त्यानंतरही दुखणं बरं झालेलं नाही. आता पुन्हा त्यांचा पाय दुखणं सुरू झालंय. डॅाक्टरांनी बाहेर न जाण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे दौरा रद्द झालाय, अशी चर्चा सुरू झालीये.
 
अयोध्या दौऱ्याला विरोध
राज्यातले मशिदीवरचे भोंगे हटवण्याची मागणी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. त्यानंतर त्यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. त्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला आहे.
 
"उत्तर भारतीयांचा अपमान राज ठाकरे यांनी केला होता. त्यांनी माफी मागावी. ही संधी आहे त्यांच्यासाठी. आता त्यांनी माफी मागितली नाही तर पुन्हा उत्तर भारतात येऊ देणार नाही. 5 जूनसाठी आमची तयारी सुरू आहे. यात संतांचाही सहभाग आहे. संत जे सांगतील ते इथे होईल," असं बृजभूषण यांनी म्हटलंय.
 
राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात अयोध्येमध्ये शक्तीप्रदर्शनसुद्धा केलं होतं.
 
राज ठाकरे आज पुण्यात सभा घेत असून याआधी त्यांनी मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद येथे सभा घेतली आहे.
 
संजय राऊतांचा टोला
राज ठाकरे यांनी दौरा स्थगित केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना टोला हाणला होता.
 
"इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिथे होते पण त्यांनी ते रद्द केले हे माध्यमांकडून मला समजलं. आम्ही त्यांना सहकार्य केलं असतं. शेवटी अयोध्या आहे. शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग अयोध्येत आहे. असं कळलं की ते जात नाहीत," असं राऊत म्हणाले
 
तसंच "भारतीय जनता पक्षाने असं त्यांच्या बाबतीत का करावं. भारतीय जनता पक्षाकडून आपण वापरले जातो हे काही लोकांना उशिरा कळतं," असासुद्धा टोला राऊत यांनी हाणला आहे.