सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (15:01 IST)

धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

rape
भंडारा जिल्ह्यातून धावत्या एसटी बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीनंतर साकोली पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली आहे. राजेश मडावी वय वर्ष 19 असे या आरोपीचं नावं असून तो बोदरा येथील रहिवासी आहे.
 
नागपूर येथे फिरायला जाण्याचा बहाण्याने आरोपी पीडित मुलीला साकोली येथून बसने घेऊन गेला. रात्रीची वेळ आणि बसमध्ये वाहक नसल्याचं गैरफायदा घेत आरोपीने बसमधील शेवटच्या सीटवर धावत्या बसमध्येच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. नागपूरला पोहोचल्यानंतर आरोपी तिला घेऊन आपल्या नातेवाइकाकडे गेला. मात्र नातेवाईकाला ही संपूर्ण परिस्थिती संशयित वाटल्याने त्यांनी राजेशला ताबडतोब घरातून निघून जाण्यास सांगितलं. त्यामुळे आरोपी राजेश अल्पवयीन विद्यार्थिनीसह रात्रीच बोदरा येथे परत आला.
 
दरम्यान, या मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला असता बोदराच्या पोलीस पाटलांनी बेपत्ता ती मुलगी राजेशसोबत गावातच असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बोदरा गाव गाठून मुलगी आणि आरोपी यांना ताब्यात घेतलं. दोघांचीही साकोली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पुढील तपास साकोली पोलीस करीत आहे.