सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (23:03 IST)

रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा स्थगित, जरांगेच्या उपोषणाबद्दल म्हणाले...

rohit panwar
प्राची कुलकर्णी
 
 'काल रात्रीपासून चर्चा आणि विचार सुरु होता याबाबत अनेक जिल्ह्यातील मराठा समाजाला आरक्षणासाठी लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे', असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली युवा संघर्ष यात्रा स्थगित केली आहे.
 
“वातावरण वेगळ्या दिशेने जाणार नाही यासाठी युवा संघर्ष यात्रा संघर्ष यात्रा काही काळ स्थगित करत आहे.
 
संतांनी एक धर्म एकत्र येऊन लढावं अशी शिकवण आहे, जरांगे पाटील यांच्या बाबत राजकारण करू नका. जाती जातीत तेढ निर्माण करु नये.”
 
गावबंदी आहे म्हणून संघर्ष यात्रा थांबवत नाही. महाराष्ट्र अस्वस्थ आहे आत्महत्या होत आहते . त्यामुळे यात्रा स्थगित करतोय, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
 
यात्रा कशी सुरू झाली होती?
तरुणांचे, बेरोजगारीचे मुद्दे घेऊन रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा निघाली होती. पुण्याहून नागपूरपर्यंत ही यात्रा जाणार होती
 
बेरोजगारी, दत्तक शाळांच्या निमित्ताने शिक्षणाचे खाजगीकरण, नोकर भरती, शिक्षक भरती अशा अनेक मुद्द्यांना ही यात्रा हात घालणार होती.
 
राष्ट्रवादी आणि नेतृत्वाची पोकळी
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बहुतांश आमदार आणि नेते अजित पवार यांच्या सोबत असल्याचं दिसत आहे.
 
फूट पडल्यानंतर राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सभा घेतल्या.
 
पण अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे, बारामती, पिंपरी चिंचवड या भागात प्रचंड शक्तीप्रदर्शन करत स्वागत यात्रा काढल्या. तरी शरद पवार गटाकडून मात्र त्याला फारसं उत्तर दिलं गेलेलं दिसत नव्हतं.
 
पुण्यात शक्तीप्रदर्शन करण्याची घोषणा राष्ट्रवादी शरद पवार गटातले नेते करत होते. त्याचं निमित्त ठरलं ती ही युवा संघर्ष यात्रा. शहरातल्या मध्यवर्ती भागात ही यात्रा फिरली. पण त्याचं नेतृत्व करत होते ते रोहित पवार.
 
पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांना भेट देत ही यात्रा टिळक स्मारक मंदिरात पोहोचली आणि त्यानंतर शरद पवारांची आशीर्वाद सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. पण यातली बरीच लोक राष्ट्रवादीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आणि शरद पवार यांच्या गटात राहीलेले नेते यांचीच होती.
 
त्याबरोबरच शिक्षक संघटना, एमपीएससीतून यशस्वी झालेले विद्यार्थी अशा काही संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते होते.
 
पण पक्षासाठी, चिन्हासाठी थेट कायदेशीर लढाई सुरू असताना लढाई सुरू असतानाच राष्ट्रवादीने काढलेल्या या यात्रेत मात्र पक्षाचं नाव आणि चिन्ह कुठेही वापरलेलं नाहीये. वेगळा लोगो, त्याचे झेंडे घेऊन ही यात्रा राज्यातल्या वेगवेगळ्या भागांना भेटी देणार आहे.
 
पक्ष बांधणीचा प्रयत्न?
तरुणांच्या मुद्द्याला रोहित पवारांनी पहिल्यांदा हात घातला नाहीये. यापूर्वी देखील एमपीएससी आंदोलन असेल की तरुणांशी निगडीत इतर मुद्दे, रोहित पवार सतत तरुणांमध्ये, त्यांच्या प्रश्नांमध्ये सक्रिय होते. पण कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या मुद्द्यावर अधिवेशनाच्या वेळी केलेल्या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर मतदारसंघातला प्रतिसाद देखील वाढला.
 
कदाचित यामुळेच आता तरुणांचा मुद्दा घेत थेट राज्यभर हा मोर्चा निघत आहे. त्यामुळे रोहित पवार हे स्वत:ला राज्यातलं नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत का अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे आणि जर त्यांना नेतृत्व करायचं असेल तर राष्ट्रवादी मधले इतर नेते ते मान्य करणार का इतकं सहज स्वीकारणार का? हा प्रश्न आहे.
 
बेरोजगारी आणि नोकरभरती हा मुद्दा महत्वाचा आणि अनेकांच्या जिव्हाळ्याचा देखील आहे. यातून परीक्षार्थी तरुणांसोबतच त्यांच्या पालकांना देखील भावणारा विषय निवडत दोन वयोगटातली लोकं जोडून घेण्याचा प्रयत्न होत आहे.
 
फूटीनंतर राष्ट्रवादीत पहिल्या फळीतल्या नेतृत्वाची पोकळी आहे. अनेक जण अजित पवारांसोबत गेले आहेत. यात आमदारांची संख्या मोठी आहे. या सगळ्या जागांवर नवं नेतृत्व उभं करणं किंवा दुसऱ्या फळीतल्या नेतृत्वाला ताकद देण्याची गरज राष्ट्रवादीला आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काम मिळाल्याने मरगळ झटकली जाण्याची शक्यता आहे.
 
यात्रांमुळे जोडली जाणारी लोकं आणि मिळणारा प्रतिसाद हा आता फॉर्म्युला झाला आहे. दक्षिणेतल्या स्टॅलिन यांची यात्रा असो की राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, या यात्रांना मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने यात्रा आखताना ती गावागावात जाईल हे देखील पाहिले आहे. हे लक्षात घेता राष्ट्रवादीचा पक्ष बांधण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतो आहे.
 
अर्थात असं असलं तरी यात्रेच्या पहिल्याच दिवशी रोहित पवार परीक्षार्थींच्या , अभ्यासिकांच्या दाराशी गेले. पण या परीक्षार्थींचा थेट सहभाग मात्र यात्रेत कमी होता. एरवी आंदोलनांसाठी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरणारी मुलं ज्या पुणे शहरात या अभ्यासिका आहेत तिथं मात्र दिसली नाहीत. त्यामुळे यात्रेला अपेक्षित प्रतिसाद मिळणार का हा प्रश्न आहे.
 
यापूर्वी देखील रोहित पवारांनी खर्ड्यात भगवा ध्वज बसवण्याच्या निमित्ताने असाच वेगवेगळ्या भागांमध्ये फिरण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा परिणाम मात्र मतदारसंघ वगळता इतर भागात फार काळ राहिला नाही.
 
राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव नसलं तरी राष्ट्रवादीचे नेते मात्र ठिकठिकाणी सहभागी होणार आहेत. रोहित पवार यांचे कुटुंबीय देखील यात्रेत सहभागी होणार आहेत.
 
ही यात्रा रोहित पवारांची, तरुणांची की राष्ट्रवादीची?
यात्रा तरुणांच्या मुद्द्यांवर असली तरी राष्ट्रवादीची यात्रा अशीच ओळख निर्माण झाली आहे. याविषयी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार म्हणाले ,"ही यात्रा राष्ट्रवादीची नाही. यात अनेक राजकीय पक्षांचे नेते सहभागी होत आहेत. काँग्रेसचे नेते आणि इतर सामाजिक कार्यकर्ते आमच्यासोबत चालत आहेत.”
 
पण याचा अर्थ राष्ट्रवादीला या यात्रेचा फायदा होणार नाही का? पत्रकार अद्वैत मेहता म्हणाले, “रोहित पवारांनी सुरुवातीला बारामतीमधून अजित पवारच निवडून येतील असं म्हणलं होतं ते आता मीरा बोरवणकर यांनी आरोप केलाय तर चौकशी होऊ द्या इतका प्रवास झाला आहे. बारामती अॅग्रोवरील कारवाईमध्ये दोघे जण आहेत, असा आरोप देखील नाव न घेता केला आहे.
 
"सुप्रिया सुळे यांनी राज्यात लक्ष घालू म्हणलं तरी कुटुंब एकच, दिवाळी एकत्रच असं म्हटलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना ब्लड इज थिकर दॅन वॅाटर हे लक्षवेधी आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना करण्याचे भाजपचे मनसुबे असू शकतील.
 
"या सगळ्या पार्श्वभुमीवर युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, कंत्राटी भरती, पेपरफूटी असे ज्वलंत विषय घेऊन यात्रा निघतेय आणि खुद्द शरद पवार हिरवा झेंडा दाखवत आहेत. एकूणच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी तर्फे रोहित पवार यांच्या तरुण नेतृत्वाची फळी निर्माण केली जात आहे."
 
निवडणूकीपुर्वी नेतृत्वाची भाकरी फिरवणे, नव्या दमाचे नेतृत्व प्रस्थापित करणे ही रणनीती पवार-ठाकरे यांची आहे. काॅंग्रेसची धूरा राहुल गांधींकडे असली तरी राज्यात ती जुन्या खांद्यांवरतीच आहे. कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्याचे फडणवीस यांनी जाहीर करुन यात्रेच्या अग्रस्थानी असलेला मुद्दा संपवून हवा काढण्याची खेळी खेळली गेली आहे.
 
ही यात्रा जर यशस्वी ठरली तरुणांचा प्रतिसाद मिळाला तर रोहित यांचे नेतृत्व प्रस्थापित होऊ शकेल. अयशस्वी झाली तर मात्र प्रश्नचिन्ह लागेल. एकूण क्रिकेटचं पिच ते राजकीय आखाडा रोहित हे शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहेत. एकूणच पवार विरुद्ध पवार सामन्यात कोणाची पावर वाढणार कोणाची गुल होणार हे बघणे इंटरेस्टिंग असेल.
 
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर म्हणाले, “राष्ट्रवादी मधल्या फुटीनंतर फारशा हालचाली झाल्या नव्हत्या. शरद पवार यांच्या सभा सोडल्या तर फारसे काही झाले नाही. नव्या तरुणांना जोडून घेण्याचा प्रयत्न म्हणून या यात्रेकडे पाहता येईल. विरोधी पक्ष मुद्दे हातात घ्यावे लागतात.
 
"80 च्या दशकात शरद पवारांनी वेगवेगळे प्रश्न घेऊन असाच प्रयत्न केला होता. विरोधी पक्षाची सध्या असणारी पोकळी भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस पक्षाचे राज्यातले नेते त्याचा फारसा उपयोग करुन घेताना दिसत नाहीयेत. राष्ट्रवादीला थेट संपर्क करून लोकांमध्ये जाऊन नवे नेतृत्व उभे करावे लागणार आहे. त्यातच मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि ओबीसी मोबीलायझेशनमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांची पंचाईत होत आहे.
 
"या मुद्द्यांना हात न घालता इतर मुद्दे घेत लोकांमध्ये जाण्याचा हा प्रयत्न आहे. तरुण प्रस्थापित पक्षांपासून दूर जात आहेत. त्यांना जोडून घेणारा आणि मराठा ओबीसी वगळून इतर मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरणारा पक्ष राष्ट्रवादी ठरतो आहे.”
 
कंत्राटी भरतीचा मुद्दा राज्य सरकारने निकाली काढला. पण कंत्राटी पदांच्या संख्येच्या जहिराती सरकारने पुढच्या काळात काढाव्या म्हणत यात्रेत तो मुद्दा जिवंत राहील याची काळजी घेतली गेली आहे.
 
अर्थात नोकरभरतीचे इतर मुद्दे तरुणांच्या दृष्टीने विशेषत स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी महत्वाचे आहेतच.
 
पण एकीकडे रोहित पवार यांची सरकार विरोधात आक्रमक यात्रा, दुसरीकडे मात्र पवार कुटुंबीय कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र असलेले दिसत आहेत. त्यामुळे या यात्रेला लोकांचा किती प्रतिसाद मिळणार आणि त्यानंतर या राष्ट्रवादीतल्या फुटीवर लोकांचा विश्वास बसणार का हे पाहणं देखील महत्वाचं.