मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (13:01 IST)

विकास दुबे इनकाउंटर हा पोलिसांनी घेतलेला सूड: संजय राऊत

उत्तर प्रदेश पोलिसांद्वारे कुख्यात गुंड विकास दुबेच्या इनकाउंटरवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा पोलिसांनी घेतलेला सूड असल्याचं सांगितलं आहे. 
 
आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा पोलिसांनी घेतलेला हा सूड असल्याचे ते म्हणाले. त्यांनी चकमकीचं समर्थन केलं नाही तरी पोलिसांचं खच्चीकरण करणारी वक्तव्यं केली जाऊ नयेत असं आवाहन केलं आहे. 
 
मोठी नावं बाहेर येऊ नयेत यासाठी विकास दुबेला ठार केल्याच्या आरोपावर संजय राऊत म्हणाले की मला तरी असं वाटत नाही. तसेच ते बोलले की हा उत्तर प्रदेश किंवा योगींचा प्रश्न नाही. देशाच्या कोणत्याही राज्यात असं झालं तर पोलीस त्याला जिवंत सोडणार नाहीत. पोलीस आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला नेहमी घेतं. जे झालंय त्याचं राजकारण होता कामा नये, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं. 
 
राऊत यांच्याप्रमाणे अशा घटना याआधीही देशात झाल्या असून मुंबईत तर अनेक एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहेत. त्यांच्यावर चित्रपटही आले आहेत. दिल्ली, हैदराबाद आणि इतर ठिकाणी देखील अशा चकमकी झाल्या आहेत. ते म्हणाले की मी खोट्या चकमकीचं कधी समर्थन केलं नाही आणि करणारही नाही. पण जर पोलिसांची हत्या झाली असेल, पोलिसांची प्रतिष्ठा आणि भीती राहिली नसेल तर देशात कायदा-सुव्यवस्था राहणार नाही.
 
उल्लेखनीय आहे की उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आलं आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. दरम्यान विकास दुबेने पळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं.