शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (14:54 IST)

धक्कादायक….. तरुणीचे दुचाकीवर अपहरण; जव्हार घाटात बलात्कार

rape
नाशिक – नाशिकमधून मुंबईनाका परिसरातील महामार्ग बसस्थानकावरुन तरुणीचे दुचाकीवर अपहरण करीत परिचीताने जव्हार घाटात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालघर येथील १८ वर्षीय पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून ती संगमनेर येथे शिक्षण घेत आहे. १९ ऑक्टोबर रोजी पीडिता पालघर येथून संगमनेर येथे जाण्यासाठी शहरात आली होती. मुंबईनाका परिसरातील महामार्ग बसस्थानकात मित्रासमवेत ती गप्पा मारीत उभी असतांना ही घटना घडली. युवती आपल्या मित्रासमवेत गप्पा मारत असतांना संशयिताने दोघांना दमदाटी करीत तिला आपल्या दुचाकीवर बसवून पळवून नेले होते. याप्रकरणी पालघर येथे पीडितेने तक्रार दाखल केल्याने हा गुन्हा मुंबईनाका पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून संशयिताविरोधात अपहरण, मारहाण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता व तिचा मित्र संगमनेर येथे जाण्यासाठी बसची प्रतिक्षा करीत असतांना पालघर येथील पीडितेचा परिचीत दुचाकीस्वार तेथे आला. तरूणी एका मुलाबरोबर गप्पा मारत असल्याने संतापलेल्या संशयित दुचाकीस्वाराने युवतीसह तिच्या मित्रास चांगलेच सुनावले. यावेळी दमदाटी करून संशयिताने तरूणीस तुला संगमनेर येथे सोडतो असे सांगून आपल्या दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. घरी जावून कुटुंबियांकडे उलटे सुलटे सांगेल या भितीने तरूणीही त्याच्या दुचाकीवर बसली मात्र संशयिताने तरूणीचे कुठलेही काही एक न ऐकता थेट त्र्यंबकरोडने पालघरचा मार्गाने दुचाकी दामटली. वाटेत जव्हार घाटातील निर्जनस्थळी दुचाकी थांबवून त्याने युवतीस जंगलात ओढून नेत ओढणीने हात बांधून तिच्यावर बळजबरीने पाशवी बलात्कार केला. यावेळी तरूणीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिच्या डोक्यात दगड हाणून जखमी केले. आपले इस्पित साध्य होताच संशयिताने पळ काढल्याने युवतीने कसेबसे घर गाठत पालघर पोलिसात तक्रार दाखल केली असून हा गुन्हा मुंबईनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor