मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (08:34 IST)

जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटनस्थळांमध्ये सिंधुदुर्ग

कोंड नेस्ट ट्रॅव्हलरने जाहीर केली यादी; लंडन, सिसिली, सिंगापूर पर्यटनस्थळांच्या पंगतीत भारतातील एकमेव ठिकाण. कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल, केरळमधील आयमानम अशा भारतीय 9 पर्यटन स्थळांत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश केला आहे. जगातील सर्वात सुंदर 30 पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गचा समावेश असणे ही खरोखरच आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.
 
कोंड नेस्ट ट्रॅव्हलर, इंडिया https://www.cntraveller.in/story/best-places-to-visit-in-india-world-2022-cnt-bhimtal-goa-shillong-seoul/ हे एक मॅगझिन तसेच वेबसाईट असून दरवर्षी जगातील सुंदर पर्यटन स्थळांची यादी ते प्रसिद्ध करतात. त्यामध्ये या पर्यटन स्थळांची संपूर्ण माहिती दिली जाते. जागतिक स्तरावरील पर्यटनास चालना देण्यासाठी त्यांच्याकडून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.
 
यंदाच्यावर्षी भेट देण्यासाठी निवडण्यात आलेल्या 30 पर्यटन स्थळांमध्ये भारतातील 9 स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा आहे. या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड होणे म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. स्वच्छ सुंदर किनारे, समुद्रातील प्रवाळ, सिंधुदुर्ग किल्ला, त्सुनामी आयलंड या सारख्या पर्यटनस्थळांविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. तसेच स्कुबा डायव्हिंगची सोय, समुद्री जीवनाचे दर्शनाची सोयही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे सिधुदुर्गातील पर्यटन सोपे झाल्याने जागतिक पर्यटनाच्या नाकाशावर सिंधुदुर्ग पोहचला आहे. या यादीमध्ये श्रीलंका, भूतान, कतार, जपान, युएई, इजिप्त, ओक्लाहोमा, सेऊल, गोबन, उझबेकिस्तान यासारख्या पर्यटनस्थळांचा समावेश आहे. आता या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनस्थळांच्या यादीत सिंधुदुर्गचा समावेश झाला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आल्याचे दिसून येते.