रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2023 (14:10 IST)

राज्याचे हिवाळी अधिवेशन : अवकाळी पावसावरून सरकारला घेरणार

vidhan bhavan
नागपूर : नागपुरात सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या तिस-या दिवशी अवकाळी पावसावर चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या चर्चेचा निर्णय देणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या चर्चेची मागणी केली होती. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या मुद्यावर चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. या चर्चासत्रात विरोधक अनेक मुद्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
 
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा सोमवारी तिसरा दिवस आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये घमासान झाल्याचे पाहायला मिळाले. नवाब मलिकांच्या मुद्यामुळे हिवाळी अधिवेशनाचे पहिले दोन दिवस अत्यंत गाजले. परंतु आता अधिवशेनाच्या तिस-या दिवशी शेतक-यांच्या मुद्यावर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान प्रश्नोत्तराच्या तासानंतर अवकाळीच्या मुद्यावर ही अल्पकालीन चर्चा होईल. या चर्चेत शेतक-यांच्या हिताचा कोणता निर्णय घेतला जाणार, हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे.
 
दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. या मुद्यावरून विरोधक सत्ताधा-यांना घेरण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत १ हजार २२८ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पण तरीही अनेक तालुक्यांचा या यादीत समावेश नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे. अशा अनेक मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
 
संकटामागून संकटे
राज्यातील शेतक-यांवर यंदाच्या वर्षात एकामागून एक संकट येत गेली. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर दुष्काळ, पुन्हा गारपीटीसह आलेल्या अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याच पार्श्वभूमीवर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक भागात दुष्काळसदृश परिस्थिती असली तरीही अनेक भागात शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यास विलंब होत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
 
अवकाळी पावसाचा फटका
जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात दिलासा देणारा पाऊस झाला नाही. त्यामुळे राज्यात अनेक भागांत दुष्काळाचे संकट कोसळले. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. यामुळे कापूस, भात यांसह रबी पिके, फळबागांना मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे.