1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2023 (20:16 IST)

नाशिकच्या एका खून प्रकरणात कोर्टाने दिला ‘हा’ निकाल

court
हनुमानवाडीतील रहिवासी सुनील वाघ खून प्रकरणी जिल्हा न्यायालयाने एका आरोपीला जन्मठेप आणि 50 हजार रुपयांचा दंड, तर अन्य सात जणांना प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
 
या खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे एका आरोपीस कोर्टाने भा. दं. वि. कलम 307 व 324 अन्वये दोन स्वतंत्र शिक्षा ठोठावल्या आहेत. गेल्या दि. 27 मे 2016 रोजी हनुमानवाडीत मातोश्री मेडिकलसमोर जुन्या भांडणाच्या कुरापतीतून तब्बल 21 जणांनी सुनील वाघ याच्यावर लाठ्याकाठ्या व दगडांनी हल्‍ला केला होता. या हल्ल्यात सुनील वाघ (वय 28) याचे निधन झाले, तरी त्याची आई मंदाबाई रामदास वाघ (वय 55) आणि भाऊ हेमंत रामदास वाघ (वय 33) हेदेखील चेहर्‍यावर, पायावर व डोक्यात दगडाचा मार लागल्यामुळे जखमी झाले होते. तत्कालीन सहाय्यक आयुक्‍त विजय चव्हाण, तसेच पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. जोनवाल, आर. एस. नरोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एम. मेश्राम यांनी या प्रकरणी तपास करून 21 जणांविरुद्ध कोर्टात खटला पाठविला होता.
 
त्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 3 चे न्या. बी. व्ही. वाघ यांच्यासमोर होऊन त्यांनी प्रमुख आरोपी कुंदन सुरेश परदेशी (वय 24) (रा. दळवी चाळ, हनुमानवाडी) यास भा. दं. वि. कलम 302 व अन्य कलमांन्वये जन्मठेप आणि 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास भोगावा लागणार आहे.
 
अन्य सात आरोपींना सात वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या आरोपींपैकी अक्षय कैलास इंगळे (रा. शिवशक्‍ती अपार्टमेंट, हनुमानवाडी) यास भा. दं. वि. कलम 307 अन्वये 7 वर्षे, तर भा. दं. वि. कलम 324 अन्वये सश्रम कारावास भोगायचा आहे. सात आरोपींमध्ये अक्षय कैलास इंगळे, रवींद्र दगडूसिंग परदेशी, जयेश हिरामण दिवे, व्यंकटेश नानासाहेब मोरे व किरण दिनेश नागरे या आरोपींचा समावेश आहे.
 
तसेच भा. दं. वि. कलम 324 अन्वये अक्षय कैलास इंगळे, रवींद्र दगडूसिंग परदेशी, गणेश भास्कर कालेकर यांना दोन वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
 
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्‍ता पंकज चंद्रकोर यांनी काम पाहिले, तर पैरवी अधिकारी हवालदार एम. एम. पिंगळे, गणेश निंबाळकर, एस. एम. जगताप, कोर्ट ड्युटी हवालदार के. पी. महाले, तसेच उपनगरचे अंमलदार तनजिम ई. खान यांनी काम पाहिले. सर्व तपास करणारे अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपींचा गुन्हा शाबित होण्याच्या दृष्टीने घेतलेल्या परिश्रमांबद्दल पोलीस आयुक्‍त अंकुश शिंदे व वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor