1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 27 मे 2022 (08:12 IST)

शेतकऱ्यांनी एकत्र येत हा कांदा निर्यात व्हिएतनामला पाठवला

onion
गेल्या काही दिवसांपासून कांद्याने शेतकऱ्यांना रडवले आहे. लोकल ते ग्लोबल स्तरावर कांद्याचा वांदा झाला आहे. आता गोल्टी कांद्याला केवळ 50 रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे समदुःखी शेतकऱ्यांनी एकत्र येत हा कांदा व्हिएतनामला पाठलवला आहे. मनमाडमधून दोन कंटेनर भरुन कांदा आतापर्यंत निर्यात करण्यात आला असून, अजून आठ ते दहा कंटेनर कांदा पाठवण्यात येणार आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात सतत घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलनेही करताना दिसत आहेत. गोल्टी कांद्याला तर केवळ 50 रुपये क्विंटल असा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना घामाचे तर मोल मिळाले नाहीच उलट पदरमोड करून कांदा विकावा लागत आहे. इतके करुनही व्यापाऱ्यांनी गोल्टी कांद्याकडे पाठच फिरविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हतबलता वाढतेच आहे.
 
मनमाडमध्ये फजल कच्छी व त्यांचे सहकारी नदीम शेख यांनी शेतकऱ्यांना एकत्र केले आणि त्यांच्याकडील कांदा निर्यात करण्याचे ठरवले. स्थानिक ठिकाणी फारसा भाव मिळत नसला तरी व्हिएतनामसह काही देशात चांगला भाव मिळू शकेल या उद्देशाने कंटेनर भरुन कांदा पाठवला जात आहे. ज्या शेतकऱ्यांना लगेचच आर्थिक गरज आहे त्यांना या कांद्याचा पैसाही देण्यात आला. तसेच जे शेतकरी काही काळ थांबू शकतात त्यांना व्हिएतनाममध्ये मिळेल त्या भावाप्रमाणे पैसे देण्यात येतील असे सांगण्यात आले. गोल्टी कांदा स्थानिक व्यापारी 1 – 2 रुपये किलोने मागत आहेत. तर व्हिएतनामला 20 रुपये किलोपर्यंत भाव मिळणार आहे. सगळा खर्च वजा करुन 6 ते 8 रुपये एका किलोमागे शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे.