शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 मे 2023 (20:38 IST)

नाशिकमध्ये उष्माघाताचा पहिला बळी!

death
नाशिक : कडक उन्हामुळे नाशिक तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी घेतला आहे. नाशिक तालुक्यातील राहुरी विंचुरी येथील शेतकऱ्यास दुपारी शेतात काम करीत असताना अचानक चक्कर आली.
 
उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, वैदयकीय अधिकाऱयाने तपासून मयत घोषित केले. साहेबराव शांताराम आव्हाड (५५, रा. राहुरी विंचुरी, ता. नाशिक) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
 
साहेबराव आव्हाड हे गुरुवारी (ता. ११) दुपारी त्यांच्या शेतामध्ये काम करीत होते. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये उष्णतेची लहर असल्याने कमाल पारा ४० अंश सेल्सियसच्यावर आहे. गुरुवारीही उन्हाची तीव्रता वाढलेली असताना, साहेबराव आव्हाड हे भरउन्हात शेतात काम करीत होते.
 
दुपारी तीनच्या सुमारास त्यांना चक्कर आल्यासारखे झाले. त्यामुळे त्यांचा भाऊ गोरखनाथ आव्हाड यांनी साहेबराव यांना तातडीने उपचारासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी डॉ. मनिषा होनराव यांनी तपासून त्यांना पावणे चार वाजेच्या सुमारास मयत घोषित केले.
 
तळपत्या उन्हामुळेच त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन त्यांचा मृत्यु झाला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, हवालदार बाळू भवर हे पुढील तपास करीत आहेत.

Edited By- Ratnadeep Ranshoor