शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जानेवारी 2023 (14:12 IST)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार

uddhav eaknath shinde
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांमुळे निर्माण झालेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
 
याचा अर्थ असा की, 14 फेब्रुवारीलाच सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठापुढे पाठवायचं की नाही, हे निश्चित सांगेल.
 
सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम.शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोेहली आणि न्यायमूर्ती पी.एस.नरसिंह यांच्या घटनापीठापुढे हे संपूर्ण प्रकरण आहे.
 
विधानसभा अध्यक्ष-उपाध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस देण्यात आली असेल, तर त्यावर विधानसभेत निर्णय होईपर्यंत पीठासीन अधिकाऱ्याला आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने अरुणाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष नाबिम रेबिया प्रकरणी काही वर्षांपूर्वी दिला आहे.
 
या मुद्याचा सात सदस्यीय घटनापीठाने फेरविचार करावा, अशी मागणी ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गेल्या सुनावणीच्या वेळी केली होती.
 
त्यामुळे या मुद्याचा फेरविचार सात सदस्यीय घटनापीठाने करणे आवश्यक आहे की नाही, याबाबत पाच सदस्यीय घटनापीठाकडून आज अपेक्षा होती.
 
हा मुद्दा सात सदस्यीय घटनापीठापुढे गेल्यास त्यावर निर्णय होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
 
तोपर्यंत पाच सदस्यीय घटनापीठापुढे अन्य मुद्यांवर सुनावणी सुरू ठेवायची की नाही, आता विधानसभा अध्यक्षांची निवड झाली असल्याने ती वैध आहे की नाही, सरकारवरील विश्वासदर्शक ठराव वैध आहे की नाही, शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर नवीन अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा की न्यायालयच त्याबाबत निर्णय घेणार इत्यादी मुद्यांबाबत आजच्या सुनावणीत दिशा स्पष्ट केली जाण्याचीही शक्यता आहे.
 
जर सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठविल्या गेलेल्या मुद्दय़ावर निर्णय होईपर्यंत अन्य मुद्यांवर सुनावणी घ्यायची नाही, असा निर्णय मंगळवारी घेतला गेल्यास पाच सदस्यीय घटनापीठापुढील अन्य मुद्यांची सुनावणीही लांबणीवर जाऊ शकते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भरत गोगावले यांच्यासह उद्धव ठाकरे गटाकडून सुभाष देसाई, सुनील प्रभू आदींनी वेगवेगळ्या मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केल्या आहेत.
 
संजय राऊतांचं सूचक ट्वीट
आज सुनावणीच्या दिवशी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्वीट केलंय.
संजय राऊतांनी 'जय महाराष्ट्र' म्हणत एक फोटो ट्वीट केलाय, या फोटोवर लिहिलंय, "मन में हमेशा, जीत की आस होनी चाहिए, नसीब बदले या न बदले.... वक्त जरूर बदलता है."
 
सर्व प्रकारच्या लढाईला सज्ज- राऊत
“आम्ही सर्वप्रकारच्या लढाईला तयार आहोत. गेल्या चार पाच महिन्यांपासून महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार सत्तेत आहे. राज्य सरकार निर्णय घेतंय, भ्रष्टाचार होतोय. हे राज्याच्या आणि देशाच्या हिताचं नाही. आपण कोणते आदर्श निर्माण करणार आहोत? हे याप्रकरणावरून स्पष्ट होणार आहे. आम्ही सत्याची मागणी करतोय. लोकशाही न्यायव्यवस्था आहे की नाही हे या खटल्यावरून सिद्ध होईल. आमची बाजू न्यायाची आहे, सत्याची आहे. सत्यमेव जयते हे बिरुद तेजाने तळपणारं असेल तर आम्हाला कायद्याच्या चौकटीतला न्याय मिळेल”, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.
 
त्यांनी पुढे सांगितलं, “पक्ष फोडण्यात आला, पैशाचा वारेमाप वापर करण्यात आला. आमदार पळवून नेण्यात आले. या आमदारांच्या वैधतेबाबतचा खटला न्यायालयात आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सरकार पडणार. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात आम्ही तारखांना सामोरं जात आहोत. तारखांवर तारखा पडत आहेत आणि घटनाबाह्य सरकार मिश्कीलपणे हसत आहे. आमच्यावर कोणतीच कारवाई होऊ शकत नाही असं त्यांना वाटतं आहे. महाशक्ती आमच्या पाठीशी आहे असं त्यांना वाटत आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे”.
 
“ठाकरे गट राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या पाठीशी. राज्य सरकारचा मृत्यू अटळ. फेब्रुवारी महिनाअखेर निकाल लागेल आणि सरकार कोसळेल. भारत जोडो यात्रेत मी पंजाबमध्ये सहभाही होणार. राहुल गांधी तपस्वीप्रमाणे यात्रा करत आहेत. हे मुडद्यात प्राण फुंकलेलं सरकार आहे. हे जानेवारीत संपेल अशी अपेक्षा होती. महाशक्तीचा हस्तक्षेप नसेल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला न्याय मिळेल”, असं राऊत म्हणाले.
Published By -Smita Joshi