रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 जुलै 2022 (16:52 IST)

शीतल म्हात्रे यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा न मिळालेलं 'ते' वादग्रस्त प्रकरण कोणतं?

"तुम्हाला रश्मीवहिनींच्या अश्रूंची शपथ आहे, बंडखोर आमदारांना सोडायचं नाही." शिंदे गटातील आमदारांना ठणकावणारं भाषण करणाऱ्या शीतल म्हात्रे यांनी अचानक एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.
 
दोन दिवसापूर्वीपर्यंत शीतल म्हात्रे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भाषणं देत होत्या आणि आता त्या शिंदे गटात सामील झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
पश्चिम मुंबईतील शिवसेनेच्या कार्यकर्त्या ते शिंदे गटात सामील होण्यापर्यंतचा शीतल म्हात्रे यांचा हा राजकीय प्रवास 12 वर्षांचा आहे. त्यांच्या या कारकिर्दीतला एक वाद कायम चर्चेत असतो.
 
शीतल म्हात्रे विरुद्ध विनोद घोसाळकर हा वाद काय आहे? थेट 'मातोश्री'च्या अंगणात गेलेलं हे प्रकरण काय होतं? यावेळी उद्धव ठाकरे ह्यांनी कुणाला साथ दिली? याच मुद्यांचा आढावा आपण घेणार आहोत.
 
कोण आहेत शीतल म्हात्रे?
शीतल म्हात्रे मुंबई महापालिकेच्या दहिसर वॉर्ड 8 च्या माजी नगरसेविका आहेत.
 
2013 आणि 2017 दोन टर्म त्या नगसेविका म्हणून या वॉर्डमधून निवडून आल्या.
 
शीतल म्हात्रे या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत. तसंच अलिबाग-पेण विभागाच्या त्या संपर्कप्रमुख आहेत.
 
प्रभाग समितीच्या अध्यक्ष राहिल्या आहेत. तसंच त्या मुंबई महापालिकेच्या कायदा समितीच्या सदस्य होत्या.
 
शीतल म्हात्रे वि. विनोद घोसाळकर वाद काय?
शीतल म्हात्रे यांनी 2013 साली शिवसेनेचे तत्कालीन आमदार विनोद घोसाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
 
"शौचालयाच्या भीतींवर आपला मोबाईल नंबर कोणीतरी लिहिला असून त्यामुळे लोक मला त्रास देतायत, यामागे विनोद घोसाळकर आहेत." असा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला होता.
 
घोसाळकर यांच्याकडून छळ होत असून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे असंही त्या म्हणाल्या होत्या.
 
आपल्या जीवाला धोका आहे अशी भीती त्यांनी शिवसेना पक्षासमोर व्यक्त केली होती.
 
विनोद घोसाळकर ह्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते.
 
हे प्रकरण एवढं वाढलं की पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान 'मातोश्री' पर्यंत जाऊन पोहचलं.
 
घोसाळकरांच्या अंतर्गत काम करणं शक्य नसून मला त्यांच्यापासून धोका आहे असं त्या म्हणाल्या. त्यांचं विभागप्रमुख पद काढून घ्या अशी मागणीही त्यांनी केली होती.
 
पक्षश्रेष्ठींनी डावललं?
भेटीसाठी अनेकदा प्रयत्न करून उद्धव ठाकरे यांनी वेळ दिली नाही, अशी तक्रार शीतल म्हात्रे यांनी त्यावेळी केली होती. इतकंच काय तर त्यांनी नगरसेविका म्हणून राजीनामाही दिला होता.
 
मग उद्धव ठाकरे ह्यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला.
 
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान म्हणाले, "विनोद घोसाळकर हे विभाग प्रमुख होते. ते प्रभावी विभाग प्रमुख होते. नेत्यावर आरोप झाले की पक्ष प्रमुखांना विचार करून निर्णय घ्यावा लागतो. पण त्यावेळी शीतल म्हात्रे यांची तक्रार होती की पक्षश्रेष्ठी आपल्या आरोपांची दखल घेत नाही. भेटण्यासाठी वेळ दिली जात नाही असं त्यांना वाटत होतं. ज्या गतीने या प्रकरणात कारवाई व्हायला हवी तेवढ्या तत्परतेने झाली नाही असंही त्या म्हणाल्या होत्या."
 
ते पुढे म्हणाले, "पण कालांतराने शीतल म्हात्रे यांनी यातून मार्ग काढला. पक्षाने नंतर त्यांना प्रवक्त्या केलं. संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे वादाच्या प्रकरणानंतरही बरेच वर्षं त्या पक्षात सक्रीय होत्या,"
 
उद्धव ठाकरे ह्यांनी साथ दिली नाही असं म्हणता येणार नाही असं वरिष्ठ पत्रकार सचिन धनजी यांना वाटतं.
 
ते म्हणाले, "त्यावेळी शीतल म्हात्रे यांची तब्येत खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. रात्री उशीरा रश्मी ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर त्यांना भेटायला गेले होते."
 
"पुढे विनोद घोसाळकर यांना विभागप्रमुख पदावरुन हटवलं होतं. युतीचं सरकार आल्यानंतर विनोद घोसाळकर यांना म्हाडा दुरुस्ती मंडळाचं अध्यक्ष पद दिलं," असंही ते म्हणाले.
 
कोर्टाकडून विनोद घोसाळकर दोषमुक्त
बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये विनोद घोसाळकर यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली.
 
माजी महापौर शुभा राऊळ आणि भाजपच्या माजी आमदार मनीषा चौधरी यांनी शीतल म्हात्रे यांच्या बाजूने भूमिका घेतली.
 
राज्य महिला आयोगानेही त्यावेळी याप्रकरणाची दखल घेतली. आयोगाने या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी अहवाल मागवला होता.
 
हे प्रकरण नंतर सत्र न्यायालयात दाखल झालं.
 
विनोद घोसाळकर यांच्याविरुद्ध केलेला एकही आरोप सिद्ध न झाल्याने मे 2018 मध्ये त्यांना सत्र न्यायालयाने दोषमुक्त केलं.
 
सत्र न्यायालयाने आपल्या ऑर्डरमध्ये म्हटलं, "शीतल म्हात्रे यांनी दरवेळी आपल्या जबाबात सुधारणा केली आहे. इतर साक्षीदारांसोबत त्यांचे जबाब सुसंगत दिसत नाहीत. उलट यामुळे त्यांचा खोटेपणा उघड होतो. घोसाळकर ह्यांना गोवण्याच्या उद्देशानेच एकापेक्षा अनेक जबाब नोंदवण्यात आले."