गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जानेवारी 2022 (22:52 IST)

सिंधुताईंनी जेव्हा कवितेच्या एका कागदासाठी मुंगसाशी झुंज दिली होती...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं आज (4 जानेवारी) निधन झालं.
वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते.
अनाथ लेकरांची आई म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक असलेल्या सिंधुताईंचा जीवनप्रवास अतिशय खडतर होता. एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी स्वतःची कहाणी सांगितली होती.
"बंड करून शाळेत जाते, हे आईला कळलं तेव्हा तिने लग्न ठरवलं. लग्नात माझं वय दहा होतं. नवरा 35 वर्षांचा होता. दुर्देव असं की माझ्या पतीला माझ्या हातात असलेला कागद सहन होत नसे. ते शिकलेले नव्हते. ते पती असून त्यांना वाचता येत नाही आणि मी पत्नी असूनही मला वाचता यायचं याचा त्यांना प्रचंड राग होता. माझ्या हातात कागद दिसला की ते मारहाण करायचे."
कागद कुठले, पुस्तकं कुठली? वाणसामानाचे कागद माझे धर्मग्रंथ होते. मी चोरूनचोरून कागद वाचायचे. कारण घरचे लोक चहाडी करायचे. माझ्या पतीला सांगितलं जायचं की तुझी बायको काम करत नाही, कामचुकारपणा करते. कागद दिसली की घरचे तक्रार सांगायचे.
 
उंदराच्या बिळात कागद लपवून ठेवायचे. उंदीर पण हलकट, ते माझे कागद बिळात आणखी खोल लोटायचे. मला सापडायचेच नाहीत. मी एक दिवस मोठं उंदराचं बिळ पाहिलं. अपनी देना बँक बढ गयी असं वाटलं मला. त्या मोठ्या बिळात कागद ठेवले. ते बिळ उंदराचं नव्हतं, मुंगुंसाचं होतं.
मुंगसाचं आणि सापाचं हाडवैर असतं. त्या कागदावर गदिमांची कविता होती. पाण्याला जाताना कागद वाचू असं डोक्यात होतं. घरी शक्य नव्हतं. मी मुंगसाच्या बिळात कागद घातला. सुरक्षित राहील म्हणून ठेवला. मुंगसाला वाटलं तो कागद आपला शत्रू आहे असं वाटलं. त्याला माझा हात सापासारखा वाटला. त्याने माझ्या डाव्या हाताची करंगळी पकडली. आजही करंगळी वाकडी आहे.
मुंगसाने डंख दिला, आगजाळ झोंबलं. त्याने माझी करंगळी सोडली नाही, मी माझा कागद सोडला नाही. कागदासकट मुंगूस बाहेर काढलं. मी वाचनाची भुकेलेली होती. रक्ताची धार त्या कवितेवर गळत होती. मी रक्ताचं अर्घ्य देऊन वाचलं. म्हणून मला विसरता आलं नाही.
 
'आईचा शिक्षणाला विरोध'
सावत्र नव्हे सख्ख्या आईने माझ्या शिक्षणाला विरोध केला. म्हशींना राखायला ती मला पाठवयाची. म्हशी पाण्यात बसल्या की मी शाळेत जायचे. म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसायच्या. उशिरा शाळेत गेल्याने मास्तरला मारलं. शेतकरी शाळेत आला आणि म्हणाला- म्हशींनी माझं शेत खाल्लं. तेव्हा मास्तरांना कळलं की म्हशी पाण्यात बसल्या की शाळेत येते. हे समजल्यावर मास्तर कळवळले. वंदिले नावाचे सर होते. चौथीची परीक्षा दिली नाही. मास्तरांना मला वरपासच करून टाकलं.
मी भीक मागत होते, गाणं म्हणत होते. मी जगले, तुम्ही जगा. माझ्या जगण्याचं प्रदर्शन करत नाही. 20 वर्षांची मुलगी, नवऱ्याने दगड मारून हाकललेली. नात्यागोत्याने हाकललेली. सख्ख्या आईने हाकललेली. माझ्यासाठी कळवळणारा बाप आधीच देवाघरी गेलेला.
20 वर्षांची मुलगी, 10 दिवसांचं बाळ. गोठ्यात बाळाला जन्म दिलेला. कारण त्याच गाईचं शेणखत मिळावं म्हणून मी लढा दिला होता. मला न्याय मिळाला होता तेव्हा वर्ध्याला रंगनाथन कलेक्टर होते. त्यांनी मला न्याय दिला. आम्हाला मजुरीही मिळायची नाही, आम्ही गोळा केलेलं शेण फॉरेस्टवाले घेऊन जायचे. शेण काढायची मजुरी द्या ना? नवऱ्याने दिवसभर गाई वळायच्या, आम्ही शेण काढायचं असं होतं. नवऱ्याचं पीठ तर बायकोचं तेलमीठ नको का? हे मी रंगनाथन कलेक्टरला पटवून दिलं. त्यांना ते पटलं. माझा विजय झाला. चांगलं करताना वाईटही होतं.