रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (21:20 IST)

बंडातात्या कराडकर नेमके कोण आहेत, ते सतत वादात का असतात?

नितीन सुलताने
प्रसिद्ध कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ असलेले बंडातात्या कराडकर हे त्यांच्या एका वक्तव्यामुळं पुन्हा चर्चेमध्ये आले आहेत.
 
सरकारच्या वाईनबाबतच्या धोरणावर टीका करताना बंडातात्या यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून हा नवा वाद सुरू झालेला आहे. राज्य महिला आयोगानंही याची गंभीर दखल घेतली आहे.
 
मात्र, बंडातात्या कराडकर हे नेहमी चर्चेत असणारं नाव आहे. यापूर्वी अनेक वादांमध्ये बंडातात्या यांचं नाव समोर आलेलं आहे. गेल्यावर्षीच मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या पुजेसाठी पंढरपुरात येण्यास त्यांनी विरोध केला होता.
त्याचबरोबर यापूर्वीही काही कंपन्यांच्या विरोधातील आंदोलनात किंवा इतर मुद्द्यांवरूनही बंडातात्या कराडकर यांनी त्यांची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडलेली आहे.
 
पायी वारीसाठी आग्रह
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं गर्दी टाळण्यासाठी आषाढीच्या पायी दिंडीला परवानगी नाकारली होती. पण त्याला विरोध करत बंडातात्या कराडकर यांनी पायी वारी सुरू केली होती.
 
त्यावेळी बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात कारवाईदेखील झाली होती. बंडातात्या कराडकर हे पंढरपूरच्या दिशेनं पायी निघाल्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती.
 
तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंदिरं बंद होती, त्यावरूनही बंडातात्या यांनी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. या निर्णयाच्या विरोधात दिवाळी साजरी न करण्याचं आवाहन बंडातात्या यांनी केलं होतं.
 
गुन्हे दाखल झाले तरी तुकाराम बीज साजरी करणार - बंडातात्या कराडकर
"यंदाच्या वर्षी देहू येथे कोणत्याही परिस्थितीत तुकाराम बीज साजरी करणार आहोत. गुन्हे दाखल झाले तरी त्यांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे," अशी भूमिका 2021 मध्ये बंडातात्या कराडकर यांनी घेतली होती.
 
बंडातात्या यांनी साताऱ्याक 22 मार्च रोजी एका कार्यक्रमात बोलताना ही भूमिका घेतली होती. ते म्हणाले, "राज्यात कोरोनाच्या नावाखाली सरकार दहशत माजवत आहे. पुण्याची लोकसंख्या लाखांमध्ये असताना तीन-साडेतीन हजार लोकांना कोरोनाची लागण झाली म्हणजे त्यात काही विशेष नाही."
"सगळी थिएटर,ढाबे, लग्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मग वारकरी सांप्रदायातील यात्रा, उत्सव व वारीला प्रतिबंध करून, ते बंद पाडण्याचा उद्योग प्रशासनातील काही लोकांकडून का सुरू आहे. आषाढी, माघी, चैत्र वारी या सर्वांवर निर्बंध आणले गेले आहेत. त्यामुळे यंदाची 30 मार्चला होणारी देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणार," असा पवित्रा तेव्हा कराडकर यांनी घेतला होता.
 
डाऊ कंपनीविरोधातील आंदोलन
काही वर्षांपूर्वी डाऊ केमिकल यां कंपनीच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळंही बंडातात्या कराडकर हे चर्चेत आले होते. 2008 मध्ये बंडातात्या कराडकर यांनी हे आंदोलन केलं होतं.
 
त्यावेळी सरकारनं त्यावेळी डाऊ केमिकल या परदेशी कंपनीला महाराष्ट्रात त्यांचा कारखाना उभारण्याची परवानगी दिली होती. पण या कंपनीमुळं इंद्रायणी नदीसह आसपासच्या परिसरात प्रदूषण होईल यामुळं त्याला स्थानिकांचा प्रचंड विरोध झाला होता.
 
या आंदोलनामध्ये बंडातात्या कराडकर यांनी त्यावेळी उडी घेतली होती. त्यासाठी अनेक प्रकारची आंदोलनं करण्यात आली होती. अखेर या विरोधामुळे या कंपनीला काढता पाय घ्यावा लागला होता.
 
पद्मश्रीसाठी माहिती देण्यास नकार
बंडातात्या कराडकर यांनी पद्मश्री पुरस्कारासाठी माहिती देण्यासही नकार दिला होता. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या केंद्राला पद्मश्रीसाठी शिफारस पाठवण्यासाठी बंडातात्या यांची माहिती मागवली होती.
 
मात्र, त्यावेळी बंडातात्या कराडकर यांनी माहिती द्यायलाच नकार दिला होता. आपण कोणताही पुरस्कार स्वीकारत नाही, असं म्हणत त्यांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला होता.
 
राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करण्यासाठीही बंडातात्या कराडकर यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली होती. हा कायदा लागू करण्यासाठी आंदोलन करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना अडवलं होतं.
 
तसंच या मुद्द्यावरून पंढरपुरात मुख्यमंत्र्यांची शासकीय महापुजा होऊ देणार नाही, असा इशाराही बंडातात्या यांनी केला होता.
 
व्यसनमुक्तीचं काम
बंडातात्या कराडकर हे सामाजिक कार्यामध्येही अग्रेसर आहे. प्रामुख्यानं व्यसनमक्तीच्या क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे. त्यासाठी त्यांनी व्यसनमुक्त संघाची स्थापनाही केली आहे.
प्रामुख्यानं व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना यातून बाहेर काढण्यासाठी यामाध्यमातून बंडातात्या हे प्रयत्न करत असतात. तसंच तरुणांना इतिहास माहिती व्हावा म्हणून गडांवर विविध सोहळ्यांचं आयोजन ते करतात.
 
वारकऱ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवतानाच वारकरी शिक्षण देणारी शाळादेखील बंडातात्या कराडकर यांनी सुरू केली आहे. फलटण तालुक्यातील त्यांच्या या शाळेत गुरुकुल पुद्धतीनं शिक्षण दिलं जातं.
 
सध्याचा वाद काय?
राज्य सरकारनं किराणा दुकानामध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून सरकारवर टीका करताना बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.
 
त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ उडाला असून, सर्व पक्षातील महिला नेत्यांनी बंडातात्यांवर त्यावरून टीका केली आहे. राज्य महिला आयोगानंदेखील त्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली आहे.
 
बंडातात्या यांच्यावर सातारा पोलिसांनी कारवाई करावी आणि दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
 
बंडातात्या यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागण्याची मागणी केली जात आहे. बंडातात्या यांनीही या प्रकरणी माफी मागण्याची तयारी दर्शवल्याचं काही माध्यमांच्या वृत्तामधून समोर आलं आहे.
अटक नाही
बंडातात्या कराडकर यांच्यावर दाखल गुन्हे हे जामीनास पात्र गुन्हे आहेत आणि सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेले गुन्हे आहेत. त्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांना अटक करता येत नाही, अशी माहिती साताऱ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराटे यांनी दिली आहे.
 
"तपासकामी बंडातात्या कराडकर यांना पोलीस स्टेशनला बोलावलं. त्यांची 2 तास चौकशी केली त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केले. तसंच त्यांना 9 तारखेला चौकशीला उपस्थित राहण्याची समज दिली. 3 तारखेला पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये विनापरवानगी रॅली काढणे आणि कोव्हिड नियमांच पालन केलं नाही म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु त्यांनी जी महिलांबाबत वक्तव्य केली त्याबाबत राष्ट्रवादीच्या सातारा जिल्ह्याच्या महिला अध्यक्षांनी सातारा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता," असं बोराटे यांनी सांगितलं आहे.
 
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्यावतीने ऍड विजयसिंह ठोंबरे यांनी पुणे न्यायालयात बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात मानहाणीचा खटला दाखल केला आहे.