1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (13:45 IST)

पत्नीच्या अंगाला हळद-कुंकू- उदबत्ती लावण्याचा प्रयत्न, गुप्तधनासाठी नरबळीचा डाव

जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे घडलेल्या एक संतापजनक घटनेत एका व्यक्तीने गुप्तधन मिळवण्यासाठी आपल्या पत्नीचा नरबळी देण्याचे नियोजन केले होते. पतीला विरोध करीत पत्नीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. संतोष पिंपळे असं अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव आहे. 
 
नेमका प्रकार काय?
जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे संतोष पिंपळे याचे शंभर वर्षांपूर्वीचे घर आहे. या घरात पिंपळे कुटुंबीयांचे पाच पिढ्यांपासून वास्तव्य आहे. येथे आरोपीने गुप्तधन शोधण्यासाठी एका मांत्रिक महिलेच्या मदतीने आपल्याच पत्नीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला आहे. पण फिर्यादी महिलेनं वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला आहे.
 
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार 22 सप्टेंबर रोजी बुधवारी रात्री आरोपी पती संतोष पिंपळेसह जीवन पिंपळे आणि एक मांत्रिक महिला घरी आले आणि त्यांनी घरातील लाकडी खांबाला काहीतरी धरबंधन केले. नंतर आरोपी संतोषने आपल्या पत्नीच्या अंगाला हळद-कुंकू आणि उदबत्ती लावण्याचा प्रयत्न केला. पण नेमकं हा प्रकार काय म्हणून घाबरलेल्या पत्नीने पतीचा विरोध केला. पण पतीने तिला मारहाण केली.
 
पत्नीने आरडाओरड केल्यामुळे मुलगा आणि शेजारील लोक घटनास्थळी पोहचले आणि तिला आरोपी पतीच्या तावडीतून सुटका केली. या घटनेची माहिती पोलिसांना आरोपी पती संतोष पिंपळे आणि जीवन पिंपळे या दोघांसह मांत्रिक महिलेला देखील अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 
बुलडाणा जिल्ह्यातील उंबरखेड येथील या मांत्रिक महिलेने या ठिकाणी गुप्तधन असल्याचे संतोष पिंपळेला सांगितले. तर हे धन मिळवण्याच्या लालसेतून या दोघांनी नरबळी देण्याचे ठरविले. त्यानुसार पौर्णिमेला संतोष पिंपळेने पत्नीला गुप्तधन असल्याच्या ठिकाणाची पूजा करण्यास सांगितले. परंतु तिने नकार दिल्यामुळे मारहाण केली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार संतोषचा दोन नरबळी देण्याचा विचार होता. पहिला बळी तुझा देतो, असे रागात त्याने पत्नी सीमाला म्हटले. ज्यामुळे ती घाबरून माहेरी निघून गेली, मात्र आपल्या चार मुलांपैकी कोणाचाही बळी जाऊ शकतो, अशी शंका आल्यावर तिने हा सर्व प्रकार माहेरी सांगितला, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
 
या प्रकरणात पत्नी आणि मांत्रिकासोबत तीन जणांना अटक केली गेलीय.

photo: symbolic